पौष्टिक चारा निर्मितीचे आधुनिक तंत्र शेतकऱ्यांच्या दारी
सुर्ला गावात युरिया चारा प्रक्रिया प्रात्यक्षिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सुर्ला गावामध्ये पशुधनासाठी पौष्टिक चारा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने युरिया चारा प्रक्रिया (Urea Fodder Treatment) या विषयावर प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये शेतकऱ्यांना व पशुपालकांना कोरड्या चाऱ्याची पौष्टिकता वाढविण्यासाठी युरियाचा योग्य वापर कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सांगितले की, युरिया प्रक्रियेमुळे कोरड्या चाऱ्यातील प्रथिनांचे प्रमाण वाढते, चारा अधिक मऊ व रुचकर बनतो आणि जनावरांची चारा खाण्याची क्षमता वाढते. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ होण्यास मदत होते तसेच जनावरांचे आरोग्य सुधारते.
या प्रात्यक्षिकात युरिया द्रावण तयार करणे, चाऱ्यावर फवारणी करणे, चारा हवाबंद पद्धतीने साठवणे आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जनावरांना खाऊ घालण्याची योग्य पद्धत यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.
शेतकऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व भविष्यात अशा तंत्रज्ञानाचा अवलंब करून पशुपालन अधिक फायदेशीर करण्याचा निर्धार व्यक्त केला. युरिया चारा प्रक्रिया ही कमी खर्चाची व प्रभावी पद्धत असल्याने पशुपालकांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
या कार्यक्रमांतर्गत कृषीकन्या भक्ती पातोंड, दिव्यानी दारोकार, स्नेहल बोरटकर, कृष्णाली वैरागडे, साक्षी श्रीरामे, आणि साक्षी रेवतकर, यांचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. पोतदार, रावे प्रमुख डॉ. आर. व्ही. महाजन , सुर्ला गावच्या रावे कार्यक्रम अधिकारी अश्विनी मानकर व कार्यक्रम समन्वयक श्री. आर. व्ही. तायडे यांनी केले.



