भद्रावतीतील अवैद्य लेआउट धारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा
मुख्याधिकारी विशाखा शेळके यांना निवेदनाद्वारे सुनील नामोजवार यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरात नगर पालिकेची कोणतीही परवानगी न घेता व पक्के रस्ते, नाली, विधुत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था न करता मुरूम टाकून रस्ते केल्याचा आव आणून व नगर पालिकेच्या रचनेनुसार नाल्या न बांधता लेआऊट सजवून ग्राहकांना मूर्ख बनवून अवैध पध्द्तीने लेआऊट धारक प्लॉट विक्री करत आहे. ग्राहकाची व शासनाची दिशाभूल करणाऱ्या त्या लेआऊट धारकावर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करा अर्शी मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार यांनी मुख्याधिकारी विशाखा शेळके यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक लेआऊट धारक कोणतीही मूलभूत सोई सुविधा न देता प्लॉट विकून मोकळे होतात व नंतर नगरपालिकेला त्या लेआऊट मध्ये विकास कामे करण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच कामे न झाल्यास नगरपालिकेची पर्यायाने नगरसेवकांची बदनामी तथा नागरिक रोष व्यक्त करतात व लेआऊट मालक प्लॉट विकून मजा मारतो. शासनाच्या नवीन नियमानुसार जो पर्यंत शासनाची परवानगी घेत नाही तो पर्यंत प्लॉट विकू शकत नाही. तसे केल्यास लेआऊट धारकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महसूल मंत्री बावनकुळे यांनी घोषित केले आहे. त्यानुसार अवैध पद्धतीने प्लॉट विक्री न करता नोटरी करून लोकांना फसविण्याचे काम सुरू आहे.
तरी भद्रावती शहरातील अश्या सर्व लेआऊट ची चौकशी करून त्या लेआऊट धारकावर फोजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करावी अश्या आशयाचे निवेदन माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक सुनील नामोजवार यांनी मुख्याधिकारी यांना दिले आहे. सदर मागणीचे निवेदन मुख्याधिकारी यांना देते वेळी काँग्रेस पक्षाच्या गटनेता सौ. सरिता सूर ,नगरसेविका सौ पल्लवी तामगडे, नगरसेवक अनिल पडोळे व नगरसेवक प्रथम गेडाम उपस्थित होते.



