ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारंजा तालुक्यातील गारपिट येथे जिल्हाधिकाऱ्यांचा रात्रीचा मुक्काम

ग्रामस्थांशी साधला थेट संवाद ; वीज आणि पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी कारंजा (घा.) तालुक्यातील गारपीट गावाला भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. यावेळी त्यांनी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तहसीलदार अनिल निनावे, अप्पर तहसीलदार नेहा मावस्कर, गट विकास अधिकारी अरुण इंगळे, विस्तार अधिकारी वानखेडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि गारपीट गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संध्याकाळी ७:३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या ग्रामसंवाद कार्यक्रमात गारपीट गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, रस्ते, वीजपुरवठा, स्वच्छता यांसह विविध मूलभूत सुविधांविषयीच्या मागण्या व समस्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडल्या. पाण्याचा प्रश्न: गावात सद्यस्थितीत गढूळ पाणीपुरवठा होत असून, कायमस्वरूपी शुद्ध पाण्याची सोय करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांना या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.

गावातील रस्त्यांवरील पथदिवे बंद असल्याबाबत आणि तेंदूपत्ता बोनस अद्याप मिळाला नसल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली. यावर तात्काळ दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी विद्युत विभागाला बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांच्या हस्ते गावातील घरकुल योजनेचे लाभार्थी श्री. राठोड यांना त्यांच्या नवीन घराची चावी सुपूर्द करून गृहप्रवेश घडवून आणण्यात आला.

जिल्हाधिकाऱ्यांनी गावातील तरुण पिढीच्या बेरोजगारीचा प्रश्न आणि आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. गावातील बेरोजगार तरुणांना त्यांच्या कौशल्यानुसार आवश्यक ते प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले. तसेच, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगार निर्मिती, स्वच्छता आणि ग्रामविकासाच्या उपक्रमांमध्ये गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये