जिल्ह्यात अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना करा
जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नार्को-कोऑर्डिनेशन समितीची बैठक

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिल्ह्यात अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक, साठवणूक आणि वापराला आळा घालण्यासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली नार्को – कोऑर्डिनेशन समिती गठीत करण्यात आली आहे. अंमली पदार्थाच्या प्रतिबंधासाठी विविध विभागाला नेमून दिलेली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी तसेच प्रभावी उपाययोजनेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा नशामुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वांनी समन्वयाने काम करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिल्या.
पोलिस विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात आज (दि.29) आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, तहसीलदार विजय पवार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पोलिस निरीक्षक अमोल बारापात्रे आदी उपस्थित होते.
तरुणांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन वाढल्याचे निदर्शनास येते, ही अतिशय गंभीर बाब आहे, असे सांगून जिल्हाधिकारी पंत म्हणाल्या, जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाची विक्री, वाहतूक व साठवूणक होणार नाही, याची दक्षता घ्या. शाळा, महाविद्यालय आणि खाजगी शिकवणी वर्गाच्या परिसरात विशेष गस्त ठेवा. तसेच विद्यार्थ्यांचे वसतिगृह परिसरातसुद्धा निगराणी ठेवावी. मेडीकल दुकानातून नशा करणारे ड्रग्ज अवैधरित्या विकले जात असेल तर त्यावर त्वरीत कारवाई करा. अचानकपणे मेडीकल दुकानांना भेट देऊन तपासणी करावी. शाळा – महाविद्यालयाच्या परिसरात प्रतिबंधात्मक पदार्थांची विक्री होणार नाही, याची खात्री करावी. तसेच अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
विविध विभागांनी करावयाची कार्यवाही : शिक्षण विभागाने शाळा महाविद्यालये व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये अंमली पदार्थ, दारू, तंबाखुचे सेवन होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच अंमली पदार्थ प्रतिबंधाबाबत निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पथनाट्य, रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करावी. सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यातील सुरू व बंद असलेल्या कारखान्यांची तसेच मेडीकल स्टोअर्सला अचानकपणे भेट देऊन अवैधरित्या होणा-या ड्रग्ज विक्रीची तपासणी करावी. जिल्ह्यात शेतांमध्ये खसखस किंवा गांजाची लागवड होणार नाही, याबाबत कृषी विभागाने दक्षता घ्यावी. अंमली पदार्थ सेवन करून रुग्णालयात आलेल्या रुग्णांची माहिती आरोग्य विभागाने त्वरीत पोलिस प्रशासनाला द्यावी.
टपालाद्वारे येणा-या पार्सलमध्ये काही अंमली पदार्थाबाबत संशय आल्यास टपाल विभाग व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्याची सुचना पोलिसांना द्यावी. सर्व ठाणेदारांनी खाजगी कुरीअर एजन्सीसोबत संपर्क ठेवून अंमली पदार्थाच्या वाहतुकीबाबत माहिती प्राप्त करून घ्यावी. पोलिस विभागाने अंमली पदार्थ बाळगणा-यांवर वेळोवेळी धाडी टाकाव्यात. तसेच अंमली पदार्थ सेवन करणा-यांविरुध्द कडक कारवाई करावी. एमआयडीसी परिसरातील बंद कारखान्यांची पाहणी करून तेथे अंमली पदार्थ उत्पादित होत नाही, याची खात्री करावी. रेल्वे विभागाने तेलंगणा व इतर राज्यातून संशयित रेल्वे प्रवाशांच्या सामानाची तसेच बेवारस सामानांची पडताळणी करून योग्य कारवाई करावी.



