ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१ मे ते १५ मे या कालावधीत डिजिटल पोर्टलवर ऑनलाईन स्व-गणना करण्याची प्रक्रिया पूर्ण.

६६० प्रगणक आणि ११५ पर्यवेक्षकांमार्फत शहरात घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलनाचे काम वेगात सुरू.

चांदा ब्लास्ट

जनगणना मोहिमेची गती वाढवण्यासाठी मनपा आयुक्तांची प्रत्यक्ष प्रभागात जाऊन पाहणी; पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन स्व-गणनेची मुदत संपली, आता प्रगणकांचे घरोघरी जाऊन माहिती संकलन सुरू

मा. आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांच्याकडून प्रत्यक्ष प्रभागांमध्ये जाऊन जनगणनेच्या कामाची पाहणी व आढावा. 

चंद्रपूर :_ शहरात सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामाची प्रत्यक्ष जमिनीवरील स्थिती जाणून घेण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त श्री. अकुनूरी नरेश यांनी आज विविध प्रभागांना अचानक भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी प्रभागात काम करत असलेल्या प्रगणकांशी (Enumerators) संवाद साधला, तसेच नागरिकांशी चर्चा करून जनगणना प्रक्रियेबाबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. डिजिटल पद्धतीने पार पडत असलेल्या या प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता राखण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

१ मे पासून सुरू झालेली ऑनलाईन स्व-गणना प्रक्रिया पूर्ण:

शहरातील जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला आगामी १ मे २०२६ पासून सुरुवात झाली होती. या पहिल्या टप्प्यात घर, कुटुंबातील भौतिक सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. प्रशासनाने दिलेल्या नियोजनानुसार, नागरिकांना ऑनलाईन स्व-गणना (Self-Enumeration) करण्यासाठी १५ दिवसांचा अवधी देण्यात आला होता, जी मुदत आता संपली आहे. ज्या नागरिकांनी या कालावधीत www.se.census.gov.in या पोर्टलवर स्वतःहून माहिती भरली आहे, त्यांचा एक ‘युनिक आयडी’ (Unique ID) तयार झाला आहे.

प्रगणकांचे घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलन सुरू:

नियोजनानुसार, १६ मे पासून मनपाचे अधिकारी आणि प्रगणक घरोघरी जाऊन प्रत्यक्ष माहिती संकलन करत आहेत. हा टप्पा 14 जून २०२६ पर्यंत चालणार आहे. ज्या नागरिकांनी ऑनलाईन स्व-गणना केली आहे, त्यांनी प्रगणक घरी आल्यानंतर केवळ आपला ‘युनिक आयडी’ क्रमांक त्यांना सादर करायचा आहे. तर, इतर नागरिकांची माहिती प्रगणक स्वतः त्यांच्या घरी जाऊन डिजिटल उपकरणांद्वारे सुरक्षितपणे संग्रहित करत आहेत.

प्रगणकांचे प्रशिक्षण शिबीर यशस्वीरित्या संपन्न:

या मोहिमेसाठी मनपा प्रशासनाकडून ६६० प्रगणक, ११५ पर्यवेक्षक व ११ फिल्ड ट्रेनर्सची नेमणूक करण्यात आलेली आहे. या प्रगणकांसाठी दिनांक २३ एप्रिल २०२६ ते ०८ मे २०२६ पर्यंत आयोजित करण्यात आलेले प्रशिक्षण शिबीर आता पूर्ण झाले असून, प्रशिक्षित कर्मचारी सध्या प्रत्यक्ष मैदानात कार्यरत आहेत. (हे प्रशिक्षण रफी अहमद किदवई शाळा, राणी हिराई सभागृह, सावित्रीबाई फुले मनपा शाळा, नवीन अभ्यासिका बाबूपेठ आणि बीजेएम करमेल अकॅडमी तुकुम या ५ केंद्रांवर पार पडले.)

प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये:

सध्या सुरू असलेला गृहनिर्माण आणि सुविधांचा हा पहिला टप्पा 14 जून रोजी संपल्यानंतर, प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना ही 1 फेब्रुवारी २०२७ मध्ये पार पडणार आहे, असे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये