शहरात तातडीने पाण्याची व्यवस्था व्यवस्थित करा
अन्यथा महिला करणार “पाणी हक्क उठाव"

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ शहरातील बाजार वॉर्ड, गंज वॉर्ड, बालाजी वॉर्ड, पठाणपुरा, बाबूपेठ, भानापेठ, हॉस्पिटल वॉर्ड, एकोरी वॉर्ड, महाकाली वॉर्ड, जलनगर वॉर्ड, बिनबागेट वॉर्ड, रामनगर, दादमहल वॉर्ड, गौतम नगर, समाधी वॉर्ड, कोतवाली वॉर्ड, दादमहल परिसर, विठ्ठल मंदिर वॉर्ड, अंचलेश्वर गेट परिसर, ताडबन परिसर तसेच भिवापूर परिसरांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून काही ठिकाणी अजूनही नियमित पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. मागील दोन वर्षांपासून अमृत योजनेअंतर्गत केवळ पाईपलाईन व मीटर बसविण्याचे काम करण्यात आले, मात्र नागरिकांच्या नळाला आजही पाणी येत नसल्याने महिलांना ४६°कं च्या कडक उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने मा. आयुक्त अकलूरी नरेश यांना निवेदन देत तातडीने नियमित व अखंडित पाणीपुरवठा सुरू करावा, टँकरद्वारे पाणीपुरवठा वाढवावा तसेच अमृत जल योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख अॅड. युवराज धानोरकर यांच्या आदेशाने नगरसेविका डीलन केळझरकर, युवासेना जिल्हाप्रमुख शैलेश केळझरकर, गोमती पाचभाई, अॅड. मृणालिनी रागीट, गीता माहुलकर, मेघा आक्केवार, सीमा मेश्राम, संतोषी कादलवार, महेश पाटील, कार्तिक डोनीवार व वीरेन वाटकर यांच्या उपस्थित निवेदन देऊन तातडीने उपाययोजना न झाल्यास चंद्रपूर शहरातील महिला महानगरपालिकेच्या नळांवर येऊन “पाणी हक्क उठाव” करतील, असा इशाराही देण्यात आला.



