ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आपले सरकार सेवा केंद्राच्या इमारतीतून ऑनलाईन कामे मार्गी लागतील – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

सावंगी (मेघे) येथे ३ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आपले सरकार सेवा केंद्राच्या स्वतंत्र २२ इमारती तयार होणार

सेवा केंद्रांसाठी ४ कोटी ३२ लक्ष रुपयाची भरीव तरतूद

वर्धा : शासनाच्या विविध योजनांचा लाभ पारदर्शक आणि गतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबविली जाते. ग्रामीण भागातील नागरिकांना अर्ज भरण्यासाठी शहरात जाण्याची गरज भासू नये, यासाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ची स्वतंत्र इमारत भरीव निधीतून उभारण्यात आली असून या इमारतीतून नागरिकांची ऑनलाईन कामे निश्चितच मार्गी लागतील, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

सावंगी (मेघे) ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ३ कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य उमेश जिंदे, ग्रामपंचायत प्रशासक संजय होटे, ग्रामपंचायत अधिकारी राहुल जुमडे, माजी सरपंच सरिता दौड, माजी उपसरपंच विलास दौड, पालोतीचे सरपंच श्री. खंडागळे, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार, विशेष कार्यकारी अधिकारी राजू थुल आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र’च्या एकूण २२ सुसज्ज इमारती ४ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणार असल्याची माहिती देताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, या सर्व इमारतींपैकी सावंगी (मेघे) ग्रामपंचायतीने सर्वप्रथम इमारतीचे लोकार्पण केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच सावंगी जिल्हा परिषद शाळेची ‘आदर्श शाळा’ म्हणून निवड झाल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

कार्यक्रमात ग्रामपंचायत भवन, ‘आपले सरकार सेवा केंद्र’ इमारत, सिमेंट रस्ते तसेच गावातील इतर विविध विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायत प्रशासक संजय होटे व ग्रामपंचायत अधिकारी राहुल जुमडे यांनी पालकमंत्र्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. प्रास्ताविक माजी उपसरपंच विलास दौड यांनी केले.

यानंतर पालकमंत्री डॉ. भोयर यांनी ग्रामस्थांकडून विविध समस्यांबाबत निवेदने स्वीकारून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचत गटातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*आपले सरकार सेवा केंद्राच्या २२ इमारती*

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या सकल्पनेतून आपले सरकार सेवा केंद्राच्या सुसज्ज २२ इमारती उभारण्यात येणार आहेत. एकूण ४ कोटी ३२ लाख ५४ हजार रुपयांच्या निधीतून या इमारती बांधल्या जाणार आहेत. वर्धा तालुक्यातील नालवाडी, उमरी (मेघे), साटोडा, पवनार, आंजी (मो), पिपरी (मेघे), बोरगाव (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), सालोड (हि), म्हसाळा, वरुड, वायगाव (निपाणी) आणि सेवाग्राम या गावांचा समावेश असून सेलू तालुक्यातील घोराड, केळझर, हिंगणी, देवळी तालुक्यातील नाचणगाव व गुंजखेडा, हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर व वडनेर तसेच समुद्रपूर तालुक्यातील गिरड या ग्रामपंचायतींचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे संबंधित गावांमध्ये शासकीय सेवा अधिक सुलभ व सुकर होणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये