ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय व बालसंरक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला व संस्थांना प्रदान करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 या चार वर्षांतील पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक हरवीर सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

सन 2020-21 चा पुरस्कार विजया विठ्ठलराव ढगे यांना प्रदान करण्यात आला. केंद्रप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देत बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य केले. तसेच बालिकांच्या उच्च शिक्षणासाठी प्रेरणा देण्याबरोबरच गावातील महिलांना मार्गदर्शन करून सामाजिक जाणीव जागृत केली.

सन 2021-22 चा पुरस्कार जयश्री सुनिल कोटगीरवार यांना देण्यात आला. शिक्षक पदावर कार्यरत असताना ‘लेक शिकवा’ अभियानांतर्गत ‘मी सावित्री बोलतेय’ या एकरुपी नाट्यप्रयोगाद्वारे शिक्षणाबाबत जनजागृती केली. तसेच ‘लेक वाचवा’, ‘तोची भोंदू ओळखावा’ आदी विषयांवरील लेखनातून सामाजिक प्रबोधन केले.

सन 2022-23 चा पुरस्कार छाया हरीभाऊ राडे यांना प्रदान करण्यात आला. शासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी ‘बेटी बचाव’, जीवनमूल्य शिक्षण, मासिक पाळीविषयक जागृती व आरोग्यविषयक उद्बोधनाचे कार्य केले. तसेच ‘हृदय स्पंदन’ उपक्रमांतर्गत ‘कविता माँ’, ‘नवी पालवी’, ‘महिलांचे साहित्यातील भागीदारी’, ‘स्त्री मन आक्रोश’ आदी लेखनाद्वारे महिलांमध्ये व्यापक जनजागृती केली.

सन 2023-24 चा पुरस्कार अनिता गणेश उगे यांना प्रदान करण्यात आला. मानधनी विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत असताना त्यांनी अल्पवयीन बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात पुढाकार घेऊन स्वतः आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा यांच्या मार्फत त्यांना ‘बालरक्षक’ म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारामध्ये दहा हजार रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, शाल, सन्मानपत्र व श्रीफळ असे स्वरूप आहे. कार्यक्रमास विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये