पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा व पोलीस मुख्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सकाळी ठीक ७:२० वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साही वातावरणात हा सोहळा पार पडला.
जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहन सोहळा सकाळी ८:०० वाजता पोलीस मुख्यालय येथे राज्याचे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते संपन्न झाला, ध्वजारोहणानंतर पोलीस मैदानावर विविध पथकांचे आकर्षक संचलन (परेड) पार पडले. पालकमंत्र्यांनी यावेळी परेडची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
उपस्थितांना संबोधित करताना डॉ. पंकज भोयर यांनी सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात त्यांनी खालील महत्त्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला: लोककल्याणकारी योजनाः राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली, शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रगती आणि पोलीस स्टेशनच्या बळकटीकरणासाठी विशेष निधीची तरतूद केल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी देशभरातील जनगणना उपक्रमात नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी २०२५ सालची पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह पदका जाहीर झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. सन्मानित व्यक्तींची नावे खालीलप्रमाणे आहेतः १. स. पो. नि श्री. मंगेश भोयर, पोउपनी, श्री. अमोल लगड, श्री. भारत पिसुडे, जाम ट्रॅक, हायवे ट्रॅफिक, श्री. सतीश दरवरे, श्री. दिनेश बोचकर सुनैना डोंगरे, तसेच, महसूल विभागातील उत्कृष्ट कार्याबद्दल माधुरी अडमाचे यांना ‘जिल्हा आदर्श तलाठी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्धा श्रीमती. सी. वान्मथी तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



