कामगारांच्या हक्कांसाठी लढा उभारण्याचा इशारा — शेख जैरुद्दीन छोटूभाई
कामगार दिनी वरोऱ्यात श्रमिकांचा गौरव; शोषणाविरोधात आवाज बुलंद

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.
राजेंद्र मर्दाने, वरोरा
वरोरा : कामगार दिनाचे औचित्य साधत वरोरा येथील कामगार चौकात विविध क्षेत्रातील कामगारांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या प्रसंगी कामगारांच्या समस्या, शोषण आणि अन्यायाविरोधात आवाज उठवत त्यांच्या न्यायहक्कांसाठी लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला.
देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे लोटल्यानंतरही आजही कामगार आपल्या न्यायहक्कांपासून वंचित आहेत. कामगारांचे होणारे शोषण देशाच्या प्रगतीसाठी बाधक ठरत असल्याचे प्रतिपादन कामगार नेते तथा माजी नगर परिषद सभापती शेख जैरुद्दीन छोटूभाई यांनी केले. कामगार दिनानिमित्त कामगार चौकातील फलकावर माल्यार्पण करून विविध क्षेत्रात कार्यरत कामगारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख संयोजक म्हणून ते बोलत होते.
या कार्यक्रमाला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे माजी सेवा अधिकारी लक्ष्मणराव गमे, वरोऱ्याचे माजी नगराध्यक्ष गजानन मेश्राम, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अनिल झोंटिंग, माजी नगरसेवक व पत्रकार राजेंद्र मर्दाने, नगरसेवक बालू ठावरी, पंचायत समितीचे माजी सभापती सुनंदा जीवतोडे, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवा अधिकारी रूपलाल कावडे, पारोदे सर, व्यावसायिक दुग्गड, सामाजिक कार्यकर्ते मुश्ताकभाई, धनवलकर, मोहसीनभाई पठाण, बावणे आदी उपस्थित होते.
छोटूभाई पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमध्ये ठेकेदारी पद्धतीने कार्यरत असलेल्या कामगारांना नियमानुसार वेतन मिळत नाही. दलाल, ठेकेदार आणि काही प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून कामगारांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. तसेच बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या सर्व समस्यांची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कामगारांना त्यांच्या न्यायोचित हक्क व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा कामगारांच्या हक्कांसाठी जिल्हास्तरावर मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
कामगार दिनाचे औचित्य साधून कामगार चौकातील फलकाला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. तसेच चौकात उपस्थित असलेल्या शेकडो कामगारांना, नगरपालिकेतील नाली सफाई कामगार, घंटागाडी कामगार, रस्ते सफाई कामगार तसेच इतर क्षेत्रातील कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प व मिठाई देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने कामगार बंधू-भगिनी व नागरिक उपस्थित होते.



