ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुळगावच्या अंकिता कातकरची यशोगाथा

सहा शासकीय परीक्षांत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       भद्रावती तालुक्यातील गुळगाव या छोट्या,दुर्गम व मागास गावातील अंकिता सीताराम कातकर हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या अंकिताने एकाच वेळी सहा शासकीय संस्थांच्या परीक्षा उत्तीर्ण करून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

अंकिताने आपले प्राथमिक शिक्षण इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,गुळगाव येथे पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चोरा येथे घेतले. पुढे तिने चंद्रपूर येथील आंबेडकर महाविद्यालयातून अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व इतिहास या विषयांसह कला शाखेची पदवी प्राप्त केली.

तांत्रिक शिक्षणातही अंकिताने प्रगती करत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), चंद्रपूर येथून विद्युत व्यवसाय पूर्ण केला तसेच माता महाकाली तंत्रनिकेतन, वरोरा येथून विद्युत तंत्रनिकेतन शिक्षण घेतले.

अंकिताने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूशन कंपनी लिमिटेड,, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन भावा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर, नार्थन कोलफील्ड लिमिटेड, महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनी लिमिटेड स्टेटया नामांकित शासकीय संस्थांच्या परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत.

अत्यंत साध्या परिस्थितीतून शिक्षण घेत, कठोर परिश्रम व आत्मविश्वासाच्या जोरावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. अंकिताच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे कौतुक होत असून तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये