जिवतीतील आदिवासी बहुल भागातील शिक्षकाला राज्यस्तरीय प्रतिष्ठित पुरस्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक, आदर्श शिक्षिका व ओबीसी रत्न पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये विजय खंडेराव राठोड यांना ‘ओबीसी रत्न क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात येत आहे.
विजय राठोड हे श्री. अंब्रु नाईक माध्यमिक आश्रम शाळा, नगराळा (ता. जिवती, जि. चंद्रपूर) येथे पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. जिवती सारख्या दुर्गम, आदिवासीबहुल तालुक्यातील आश्रम शाळेत काम करताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट योगदान दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न, विशेषतः ‘शिक्षण आपल्या दारी’ सारख्या उपक्रमांमधील सक्रिय सहभाग आणि सामाजिक कार्य याची दखल घेत संघटनेने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.हा पुरस्कार महात्मा ज्योतीराव फुले यांच्या क्रांतिकारी विचारधारेला समर्पित आहे. ओबीसी समाजातील शिक्षकांच्या उत्कृष्ट कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाने हा सोहळा आयोजित केला आहे. आदिवासी भागात राहूनही दर्जेदार शिक्षण देण्याचे आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम राठोड सातत्याने करत आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.
विजय खंडेराव राठोड यांच्या या यशाबद्दल जिवती, नगराळा परिसरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



