गोंडपिपरीत MIDC विरोधात शेतकऱ्यांचा तीव्र एल्गार
हजारोंचा जनसागर उपस्थित ; प्रशासनाविरोधात संताप उसळला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित MIDC औद्योगिक क्षेत्राविरोधात गुरुवारी (दि. २३) तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी अभूतपूर्व आणि आक्रमक आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, चक वडकुली, सिरसी देऊळवार, चक बेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा व खरारपेठ या बारा गावांतील हजारो शेतकरी, शेतमजूर, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी आंदोलकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार टीका करत “शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देऊन उद्योगपतींचे हित जपले जात आहे” असा गंभीर आरोप केला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, “जमीन हिरावून घेण्याचा कुठलाही डाव सहन केला जाणार नाही.”
प्रस्तावित प्रकल्पामुळे सुपीक शेती जमीन नष्ट होणार, जलस्रोतांवर प्रचंड ताण येणार, तसेच पर्यावरणीय प्रदूषण व मोठ्या प्रमाणावर विस्थापनाचा धोका निर्माण होणार असल्याचे आंदोलकांनी ठामपणे मांडले. याशिवाय, भूसंपादन प्रक्रियेत आवश्यक असलेल्या सामाजिक व पर्यावरणीय परिणाम अहवालात पारदर्शकतेचा अभाव असून, सार्वजनिक सुनावणी केवळ औपचारिकतेपुरती असल्याचा आरोपही करण्यात आला.
“आमची संमती न घेता जमीन घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा आमच्या मूलभूत हक्कांवर थेट आघात आहे,” असा संतप्त सूर आंदोलकांनी लावला. “मोबदला नको, पण जमीनही देणार नाही,” अशी भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला थेट आव्हान दिले.
गोंडपिपरी औद्योगिक संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. “जोपर्यंत MIDC प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल,” असा निर्धार समितीने व्यक्त केला. “आपली शेती_आपला हक्क” या घोषणांनी परिसर दणाणून गेला असून, प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास येत्या काळात रास्ता रोको, बंद, व जिल्हा स्तरावरील मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
यावेळी गोंडपिपरी तालुका औद्योगिक क्षेत्र संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष संजय वडसकर, उपाध्यक्ष सूरज माडुरवार, सचिव राजू झाडे, कल्पेश खरबनकर यांचेसह समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन आणि प्रास्ताविक सचिन फुलझेले यांनी केले तर आभार शंकर पाल यांनी मानले. सदर कार्यक्रमाला १२ गावातील महिला, पुरुष, तरुण_तरुणी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



