ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गरिबांच्या ताटातील धान्य थेट व्यापाऱ्यांच्या घशात

गोडाऊन किपर व दुकानदारांच्या संगनमताचा संशय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

 धान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा धक्कादायक प्रकार

गोंडपिपरी :_ तालुक्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत मिळणाऱ्या स्वस्त धान्याच्या गैरव्यवहाराचा गंभीर प्रकार उघडकीस येत असून, गरिबांच्या ताटातील धान्यच आता व्यापाऱ्यांच्या घशात जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील काही स्वस्त धान्य दुकानदारांनी गोडाऊन किपरला हाताशी धरून मोठा गैरप्रकार सुरू केल्याची चर्चा आहे. शासनाकडून गोरगरीब, गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे तांदूळ, गहू व इतर धान्य प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी थेट व्यापाऱ्यांकडे वळवले जात असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे धान्य मिळत नाही.

या प्रकारातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही ठिकाणी लाभार्थ्यांना धान्य देण्याऐवजी थेट रोख रक्कम देऊन प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. गरिबांना त्यांच्या हक्काचे अन्नधान्य नाकारून काही रुपये देणे हा अन्यायकारक प्रकार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. अनेक कुटुंबे या योजनेवर अवलंबून असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहावर याचा थेट परिणाम होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या संपूर्ण प्रकारात गोडाऊन स्तरावरूनच धान्य कमी प्रमाणात दाखवले जाते किंवा नोंदीत फेरफार केला जातो. त्यानंतर दुकानदार व व्यापारी यांच्यात संगनमत करून धान्य काळ्या बाजारात विकले जाते. त्यामुळे शासनाच्या योजनांचा उद्देशच हरवत असून, भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे.

दरम्यान, काही जागरूक नागरिकांनी या प्रकाराबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्याचेही समोर आले आहे. मात्र अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. सदर प्रकार हा अनेक गावातून समोर येत आहे. त्यामुळे दोषींवर कठोर कारवाई करून गरिबांना न्याय द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना शिक्षा दिली गेली नाही, तर भविष्यातही असे प्रकार सुरूच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे आणि गरजूंपर्यंत योग्य लाभ पोहोचवणे अत्यंत गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये