स्वानंदचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
छत्रपती संभाजीनगर येथील मुक्ती सोपान न्यास वृद्धाश्रम, येथे एक अनोखा आणि सामाजिक भान जपणारा वाढदिवस साजरा करण्यात आला. सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री काशिनाथ पांडुरंग खांडेभराड व त्यांच्या धर्मपत्नी सौ. शीला खांडेभराड यांचा नातू चि. स्वानंद अमित खांडेभराड यांचा वाढदिवस वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत 17 एप्रिल रोजी साजरा करण्यात आला.
या निमित्ताने केवळ वाढदिवस साजरा न करता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध वस्तूंचे दानही करण्यात आले. यामध्ये गहू, तांदूळ, तेल, बिस्किटे, साबण तसेच इतर आवश्यक वस्तूंचा समावेश होता.
वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतल्यामुळे खांडेभराड परिवाराचा आनंद द्विगुणित झाला. या प्रसंगी वृद्धांसोबत संवाद साधत आनंदाचे क्षण वाटून घेण्यात आले.
कार्यक्रमावेळी वृद्धाश्रमाच्या सचिव मालती करंदीकर, श्री काशिनाथ खांडेभराड यांची बहीण शोभाताई गायकवाड, त्यांचे भाचे श्री महेश गायकवाड व ऋषिकेश घायाळ, तसेच भाचेसून साक्षी घायाळ उपस्थित होते.
समाजात अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी दृढ होत असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श उपक्रम म्हणून पाहिला जात आहे.



