महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी-पालक समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदुर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी विद्यार्थी-पालक समुपदेशन व व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. अनिल चिताडे (प्राचार्य, राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना JEE, MHT-CET, CUET, NEET, CLAT, NDA आदी स्पर्धा परीक्षांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. PowerPoint सादरीकरणाच्या माध्यमातून त्यांनी विविध अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, तयारीची रणनीती तसेच करिअरच्या संधी यांचे प्रभावीपणे विवेचन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे यांनी केले. त्यांनी महाविद्यालयात वर्षभर राबविण्यात आलेल्या MHT-CET उपक्रमाची सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी संस्थेचे प्रयत्न अधोरेखित केले.
या कार्यक्रमासाठी गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव धनंजय गोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य साईनाथ मेश्राम होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्यांच्या यशाचा मार्ग अधिक सुकर होतो, असे सांगितले.
यावेळी प्रभाकर कोल्हे यांनीही विद्यार्थ्यांना अभ्यास पद्धती, वेळेचे व्यवस्थापन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास इयत्ता १२ वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने पालकांसह उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी व पालकांनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला आणि कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रा तब्बसूम शेख, प्रा सुरेखा झाडे, प्रा सागर नागपुरे, प्रा मंजुषा टेकाम, प्रा नितीन वाढई, प्रा प्रशांत ताजने यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा प्रगती आगे यांनी केले.



