भद्रावतीत रेल्वे प्रवासादरम्यान अनोळखी इसमाचा मृत्यू
ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी भद्रावती येथील कोंढारी परिसरातील रेल्वे लोकेशन ५८७/० येथे एक अनोळखी इसम गंभीर अवस्थेत आढळून आला. विशाखापट्टणम ते नवी दिल्ली जाणारी आंध्रप्रदेश एक्सप्रेस गाडी सिग्नल न मिळाल्याने थांबलेली असताना सदर इसम गाडीतून खाली उतरून लडखडत चालत येताना दिसला. त्याच्या तोंडातून फेस येत असून त्यास फिट आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. कर्तव्यावर असलेले ट्रॅकमन संदीप मंन्दे तसेच रूपेश घाटे व रवि बन्सल यांनी तत्काळ त्या इसमाला मदत करून प्रथम घोडपेठ प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय भद्रावती येथे हलविण्यात आले.
मात्र उपचार सुरू असतानाच अॅम्बुलन्सची प्रतीक्षा करताना त्या इसमाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी पोलीस स्टेशन भद्रावती येथे मर्ग क्र. ३२/२०२६, कलम १९४ भा.ना.सू.सं. अन्वये नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. मृत इसमाचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून बांधा सडपातळ व मजबूत आहे. उंची सुमारे ५ फूट ३ इंच आहे. त्याने अंगात पांढऱ्या रंगाचा हाफ टी-शर्ट, आत बनियन, निळ्या रंगाची पॅन्ट व काठ्या रंगाची लाईनिंग असलेली अंडरवेअर परिधान केली होती.
कमरेला ब्राऊन रंगाचा चामडी बेल्ट होता. त्याच्या खिशात विशाखापट्टणम ते नवी दिल्ली दरम्यानचे जनरल रेल्वे तिकीट (क्रमांक 610BEBM2CS, दिनांक १७/०४/२०२६) आढळून आले. या अनोळखी मृतकाची ओळख पटविण्यासाठी भद्रावती पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणाला माहिती असल्यास भद्रावती पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष हजर राहून माहिती द्यावी, असे आवाहन ठाणेदार योगेश्वर पारधी यांनी केले आहे



