
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथील शेतकरी दिपक जगन्नाथ रोहनकर यांच्या शेतातील गोठ्याला (दि.१६) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास अचानक आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत गोठ्यातील सात शेळ्या आणि तब्बल १५० कोंबड्या जळून खाक झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेत ट्रॅक्टरचे दोन नवीन मोठे टायर, दोन पेट्रोल फवारणी पंप, तीन चार्जिंग फवारणी पंप, पाच झटका मशीन, तसेच सुमारे तीन क्विंटल मका, एक क्विंटल तांदूळ, कोंबड्यांचे खाद्य आणि हार्वेस्टिंग केलेले दोन क्विंटल कांद्याचे पीक आगीत पूर्णतः जळून खाक झाले. याशिवाय शेतीसाठी लागणारे इतर साहित्य व अवजारेही नष्ट झाली आहेत.
या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, शासनाने तातडीने पंचनामा करून बाधित शेतकऱ्याला नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.



