वेकोलि प्रकल्पग्रस्तांना नोकरीसह 30 लाख प्रतिएकरी मोबदला द्या- हंसराज अहीर
केंद्र सरकारने याविशयी सकारात्मक निर्णय घ्यावा

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर / यवतमाळ / नागपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात किलोनी-टाकळी या कोळसा खाणीकरिता भुमी अधिग्रहण होत असून सेक्शन-4 ची नोटीस जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तसेच महाराष्ट्र राज्यातील नव्या प्रस्तावित कोळसा खाणींकरिता होत असलेल्या भुमी अधिग्रहणापोटी नोकरीसह प्रतिएकरी कमीतकमी रू. 30 लाख मोबदला देण्यात यावा अशी शीफारस राज्यशासनाने केंद्र सरकारकडे करावी अशी आग्रही मागणी पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री तथा राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे पूर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांनी राज्याचे मुख्यमंत्री व महसुलमंत्री यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये आजवर कोळसा खाणींकरिता मोठ्या प्रमाणात कृषीयोग्य जमिनीचे अधिग्रहण झालेले आहे. सन 2012 पासून वेकोलिद्वारा अधिग्रहीत असिंचीत जमिनीला प्रतिएकरी 8 लाख व सिंचीत जमिनीला 10 लाख रूपयांचा मोबदला मिळत आहे. परंतु वर्तमानात मिळणारा हा मोबदला अत्यंत कमी असल्याने वेकोलि प्रकल्पाशी निगडीत शेतकऱ्यांवर प्रचंड आर्थिक अन्याय होत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत हंसराज अहीर यांनी केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी व कोल इंडीयाकडे नोकरीसह प्रति एकरी रु. 30 लाख मोबदला देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांवर होत असलेल्या या अन्यायाची दखल घेत वाढीव मोबदल्याविषयी केंद्राकडे शिफारस केल्यास वाढीव मोबदल्याबाबत विचार केला जाईल. त्यामुळे वेकोलिच्या प्रकल्पपिडीत शेतकऱ्यांना न्याय मिळेल. सद्यस्थितीत अत्यल्प मोबदला मिळत असल्याने शेतकऱ्यांवर आर्थिकदृश्टया फार मोठा अन्याय होत आहे. वेकोलि प्रकल्पबहूल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक खासगी उद्योग व कंपन्यांद्वारे सुध्दा शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. परंतु या खासगी उद्योगांकडून संबंधित शेतकऱ्यांना वेकोलि मोबदल्याच्या तुलनेत प्रतिएकरी 3 पट नोकरीसह मोबदला म्हणजेच प्रतिएकरी रू. 30 लाख व त्याहून अधिक मोबदला दिला जात आहे. खासगी उद्योगांच्या धर्तीवर वेकोलि कोळसा खाणींकरिता अधिग्रहीत होत असलेल्या जमिनींना सुध्दा नोकरीसह प्रतिएकरी रू. 30 लाख मोबदला देण्यात यावा अशी शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केल्यास वेकोलि प्रकल्पपिडीतांना न्याय मिळेल असेही हंसराज अहीर यांनी या पत्रात म्हटले आहे.
खासगी अन्य उद्योजक 30 लाखाच्यावर एकरी मोबदला देत आहे. वेकोलिद्वारा अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींना सुध्दा नोकरीसह प्रतिएकरी किमान रू. 30 लाख मोबदला मिळण्याकरिता राज्यसरकारने केंद्राकडे शिफारस करावी तसेच केंद्र सरकारने सुध्दा या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेत शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती सुध्दा अहीर यांनी सदर पत्रातून केली आहे.



