ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘गरीब आहे’ ही न्यूनतेची भावना दूर सारून शिक्षण घ्या आणि कर्तृत्वाने मोठे व्हा: आ. सुधीर मुनगंटीवार

सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित समता सप्ताहाचे आ मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन

चांदा ब्लास्ट

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हा मंत्र देणारे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्वाचे रत्न आहेत. त्यांनी दाखवलेल्या ज्ञानाच्या मार्गावर चालणाऱ्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे भविष्य निश्चितच उज्वल आहे. असे आवाहन माजी मंत्री आ सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

पुढे बोलताना त्यांनी नमूद केले की, डॉ. आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्त्री सन्मानाला विशेष स्थान दिले. “नारी से नारायणी तक” या संकल्पनेनुसार महिलांच्या सर्वांगीण प्रगतीचा त्यांनी विचार केला. त्यांच्या प्रेरणेतून चंद्रपूर जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी ५०० क्षमतेचे मुलींचे वसतिगृह उभारण्यात आले असून बल्लारपूर, मूल आणि पोंभुर्णा येथेही मुलींसाठी वसतिगृहांची उभारणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

सामाजिक न्याय विभागातर्फे आयोजित समता सप्ताहाचे उद्घाटन आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. कार्यक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.

उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार मुनगंटीवार यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.रमाई आवास योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुल वितरित करण्यात आले असून, पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना या योजनेत सर्वाधिक घरकुल चंद्रपूर जिल्ह्यात देण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. डॉ. आंबेडकरांच्या वैचारिक ऊर्जेमुळेच समाज विकासाच्या वाटेवर अग्रेसर झाला असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

याशिवाय, लंडन येथील डॉ. आंबेडकरांच्या वास्तव्यास असलेल्या इमारतीत स्मारक उभारण्याच्या प्रस्तावावर अर्थमंत्री म्हणून स्वाक्षरी करण्याचा मान मिळाल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले. समता, ममता आणि बंधुत्व या मूल्यांच्या आधारे समाज उभारणीसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. इतिहासाचा संदर्भ देताना पंडित जवाहरलाल नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांच्या काळात राष्ट्रीय सैनिक कोषासाठी चंद्रपूर जिल्ह्याने देशात सर्वाधिक सुवर्णदान केल्याचा अभिमानास्पद उल्लेख त्यांनी केला. तसेच नागपूर-चंद्रपूर परिसरातील ऐतिहासिक दीक्षाभूमीचा वारसा अधोरेखित करत, याच भूमीत डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा देऊन सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिला, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे, मनपा सदस्य सुनीता जयस्वाल, श्रीकृष्ण नागापुरे, भीमराव रायपुरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, रामपाल सिंह, शुभम गेडाम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या माध्यमातून समता, शिक्षण आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये