रानडुकरांचा कळप आडवा आल्याने पिकअप उलटली
१२ जण जखमी, ६ जणांची प्रकृती चिंताजनक ; चनई बूज - खैरगाव मार्गावरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :_ लग्नकार्यावरून परतत असताना रानडुकरांचा कळप अचानक समोर आल्याने पिकअप वाहन उलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली. कोरपना तालुक्यातील चनई बूज – खैरगाव मार्गावर सोमवार, १३ एप्रिल रोजी सायंकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेत एकूण १२ जण जखमी झाले असून, त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, हातलोणी येथील काही नागरिक चोपण येथील हनुमंत पंधरे यांच्याकडे आयोजित लग्नकार्यासाठी पिकअप क्रमांक एम एच ३४ सी क्यू १००८ या वाहनाने गेले होते. लग्न सोहळा आटोपून सर्वजण रात्रीच्या सुमारास आपल्या गावी परतत असताना, चनई बूज – खैरगाव मार्ग दरम्यान अचानक रानडुकरांचा मोठा कळप रस्त्यावर आला. डुकरांना वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने अचानक जोरात ब्रेक मारला, ज्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्यावरच उलटली.
या अपघातात वाहनातील १२ प्रवाशांना दुखापत झाली. यातील सहा गंभीर जखमीं रुग्णांना चंद्रपूर येथे हलविण्यात आलेले आहे.यात विकास लिंगु किंनाके (२३), विक्रम मेश्राम (२०), शिवम कोवे (२०), अनुज लिंगू उदे, रामू हनुमान कोरांगे (२२) आणि साक्षी भास्कर किनाके (१९). या सहा जणांना गंभीर दुखापत असल्याने प्राथमिक उपचारानंतर तातडीने चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.तर रणवीर देविदास आत्राम (२३), जोशना प्रमोद कुमरे (२४), प्रांजली शंकर किन्नाके (१९), सौरभ मोतीराव मडावी (१९), गणेश संतोष कोवे (१७), त्रिशा विठ्ठल गेडाम (सर्व राहणार.हातलोणी) हे ग्रामीण रुग्णालय, कोरपना येथे उपचार घेत आहे.
सदर अपघाताची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सदर घटनेचा पुढील तपास कोरपना पोलीस करत आहेत.



