ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजातील सर्वच घटकांस विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

हिंगणघाट येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा अनावरण, सौंदर्यीकरण कामाचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आदर्श आणि आपल्या हक्काची जाणीव करुन देऊन प्रत्येकाला विकास प्रक्रियेत आणण्याठी व त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. त्यादृष्टीने विविध विकासकामे राबवून राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी केले.

हिंगणघाट येथे नगर परिषदेच्यावतीने जिल्हा वार्षिकच्या नाविण्यपूर्ण योजनेतून 1 कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण व परीसराच्या सौदर्यीकरण कामाचे लोकार्पण श्री.सिरसाट यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री डॉ. पंकज भोयर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अमर काळे, आमदार समीर कुणावार, नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, उपाध्यक्ष निलेश ठोंबरे, नगर परिषदेचे बांधकाम सभापती वामन मावळे, मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे, छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर विकास जैन, विद्याताई सोमकुंवर, विजय तामगाडगे उपस्थिते होते.

राज्य शासनाच्यावतीने समाजातील प्रत्येक घटकाचा विकास करण्यासाठी भरीव निधीची तरतुद अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. महाड येथील चवदार तळ्याच्या विकास कामासाठी 56 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. दादर येथील चैत्यभूमीचा विकास करण्यासाठी 500 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. महाराष्ट्रातून अनेक बौध्द बांधव बौध्दगया येथे जात असतात, तेथे त्यांच्या राहण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने 10 एकर जागा खरेदी करणयात येणार आहे. यासाठी लवकरच बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन जमीन खरेदीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजनेंतर्गत पुढील महिन्यात बौद्धगया येथील दर्शनासाठी भाविकांसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. प्रवासासह सर्व सुविधा राज्य शासनाच्यावतीने मोफत दिल्या जाणार आहे. त्यामुळे या योजनेचा बौध्द बांधवांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन यावेळी श्री.शिरसाट यांनी केले.

*मागासवर्गीय घटकासाठी भरीव तरतूद – डॉ. पंकज भोयर*

राज्य शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबवित असतांना मागासवर्गीस समाजातील लोकांना केंद्रबिंदू ठेवून सामाजिक न्याय विभागासाठी अर्थसंकल्पात 1200 कोटीची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 50 कोटी रुपये वसतीगृहाच्या निर्मितीवर खर्च करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले. हिंगणघाट येथील पुतळा सौंदर्यीकरणाच्या उर्वरीत कामासाठी 1 कोटी रुपये मंजूर करण्यात येत असल्याचेही ते पुढे बोलतांना म्हणाले.

*महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याची गरज – खा.अमर काळे*

देशात ठिकठिकाणी महापुरुषांचे पुतळे मोठ्या प्रमाणावर आहेत. महापुरुषांचे पुतळे केवळ जयंती व पुण्यतिनिमित्त अभिवादन करण्यासाठी मर्यादित न ठेवता त्यांचे विचार सदैव आचरणात आणण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी दिलेला मंत्र शिकाल तर वाचाल या विचाराप्रमाणे गाव तिथे वाचनालय व अभ्यासिका होणे गरजेचे आहे. जेणेकरुन तळागाळातील विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची ओढ निर्माण होऊन प्रसासकीय अधिकारी होण्याची त्यांनी संधी मिळेल, असे खा.अमर काळे म्हणाले.

गेल्या अनेक वर्षांपासून असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा दुरुस्त करण्याचे निवेदन प्राप्त झाले होते. त्याप्रमाणे पुरातत्व विभागाकडून पुतळ्याची तपासणी करुन नवीन पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 1 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नगर पालिकेचे कमी वेळेत पुतळा उभारण्याचे व सौंदर्यीकरणाचे काम केल्याबद्दल आ. समीर कुणावार यांनी नगर पालिकेचे आभार मानले. यावेळी त्यांनी हिंगणघाट येथे आर्टी व बार्टीचे प्रशिक्षण केंद्र व्हावे, विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून वातानुकुलीत अभ्यासिका व्हावी तसेच अण्णाभाऊ साठे वस्ती सुधार निधीत वाढ करण्याची मागणी मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे केली.

यावेळी नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी सुध्दा आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवराचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण करुन सौंदर्यीकरणाच्या कोनशिलचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये