ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोबाईल हिसकल्याचा वादातून जीवघेणा राडा

दगडाने ठेचून युवकाची हत्या, एकास अटक

  1. चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू : – मोबाईल हिसकल्याच्या किरकोळ वादातून मनात राग धरून २० वर्षीय युवकाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी शहरात उघडकीस आली. बेलगाव येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आज शनिवारी सकाळी विश्रामगृहाच्या मागील भागातील बोर नदीच्या पात्रात आढळून आला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण योगीराज राऊत(वय २०) रा. बेलगाव असे मृतकाचे नाव आहे. तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता. याबाबत शुक्रवारी(ता. १०) पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान शनिवारी सकाळी बोर नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तपासादरम्यान मृतदेह प्रविण राऊत याचाच असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलिसांनी संशयावरून त्याचा मित्र सुरज रमेश ढगे(वय २०) यास ताब्यात घेतले. चौकशीत मोबाईल हिसकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे समोर आले. या वादाचा राग मनात धरून सुरज ढगे याने प्रवीणला दगडाने ठेचून ठार मारल्याची कबुली दिली. हत्या केल्यानंतर मृतदेह स्मशानभूमी परिसरातील डोहात फेकून दिल्याचेही त्याने सांगितले.

पोलिसांनी आरोपी सुरज ढगे यास ताब्यात घेतले असून या घटनेत आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. पुढील तपास सेलू पोलिसांकडून करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये