ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांचा कायापालट होणार – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

समाज कल्याणच्या सर्व अभ्यासिका वातानुकूलित करणार ; सामाजिक न्याय विभागाच्या दोन वसतिगृहाचे भुमीपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा : ग्रामीण भागातून स्वप्न उराशी बाळगून येणाऱ्या या मुलांच्या डोळ्यांत भविष्याचा उद्धार करण्याची जिद्द असते. त्यांना दर्जेदार सुविधा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. म्हणूनच आता नवीन होणारी सर्व वसतिगृहे अत्याधुनिक असतील. तसेच मुलांच्या अभ्यासासाठी असणाऱ्या लायब्ररी आणि स्टडी रूम आता वातानुकूलित असतील. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाची क्षमता देखील वाढविण्यात आली असून वसतिगृहांचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केले.

वर्धा शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या महादेवपूरा व नालवाडी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाचे भुमीपूजन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी वान्मथी सी, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, समाज कल्याण उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाण नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर, विजय आगलावे आदी उपस्थित होते.

प्रकल्पांच्या कामात पारदर्शकता आणि वेग आणण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या कामांसाठी आगाऊ निधी उपलब्ध करुन दिला आहे. जेणेकरून निधीअभावी काम थांबू नये. काम वेळेत पूर्ण न झाल्यास थेट खात्यातून पैसे कपात करण्याचा इशारा कंत्राटदारांना देण्यात आला असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गुलामातून माणूस बनवले आहे, ही गोष्ट कधीही विसरू नका. तुम्ही शिक्षण घेऊन मोठे व्हा आणि आपल्या कुटुंबाचा व समाजाचा उद्धार करा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्र्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले. येत्या मे महिन्यात संपूर्ण विदर्भ दौऱ्यावर राहून विविध वसतिगृहांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी आणि उद्घाटन करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे नियोजन सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात आले असून इच्छुकांनी आपली नावे नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

*मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या निवासाचा प्रश्न मार्गी- डॉ.पंकज भोयर*

वर्ध्यातील मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह 1967 पासून भाड्याच्या किंवा जुन्या इमारतीत सुरू होते. या इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. मात्र, आता सामाजिक न्याय विभागाने निधी उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. मागासवर्गीय विद्यार्थिनींच्या निवासाचा प्रश्न मार्गी लावणारी दोन भव्य शासकीय वसतिगृहे लवकरच साकारली जाणार आहेत. महादेवपुरा आणि नालवाडी परिसरात प्रत्येकी 250 प्रवेश क्षमता असलेल्या ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृहाच्या’ इमारती आगामी काळात तयार होतील, असे ते म्हणाले

वर्धा हे शैक्षणिक केंद्र असल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओढा मोठा आहे. हे लक्षात घेता, अस्तित्वात असलेल्या शासकीय वसतिगृहांची प्रवेश क्षमता वाढवून मिळावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी सामाजिक न्यायमंत्र्यांकडे केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी वसतिगृहाच्या इमारतीचे भुमीपूजन करुन कोनशिलेचे अनावरण केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये