शासकीय वसतीगृहासाठी जागा उपलब्ध करुन निधीसाठी प्रस्ताव सादर करावे – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
समाज कल्याण विभागाची आढावा बैठक ; रोबोटच्या माध्यमातून देणार विद्यार्थ्यांना शिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सर्व लायब्ररी व अभ्यासिका वातानुकुलीत करणार
वर्धा : सामाजिक न्याय विभागामार्फत सुरु असलेल्या सर्व शासकीय वसतीगृहाच्या इमारती ह्या शासकीय असाव्यात. ज्या वसतीगृहाच्या इमारती खाजगी इमारतीमध्ये भाडेतत्वावर आहे. त्यासाठी तात्काळ जागा उपलब्ध करुन घ्याव्या तसेच जीर्ण झालेल्या इमारतीच्या नवीन बांधकामाकरीता प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आज समाज कल्याण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्यात.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घेतला. यावेळी त्यांनी सुचना केल्या. बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अपर जिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष दत्तप्रसाद नडे, समाज कल्याण उपायुक्त प्रसाद कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त जया राऊत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठाण नागपूरचे व्यवस्थापकीय संचालक सुरेंद्र पवार, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त अंकेश केदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर आदी उपस्थित होते.
राज्य शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेंतर्गत बौध्दगया, अयोध्या तसेच इतर धार्मिक स्थळासाठी दुसऱ्या टप्प्याला सुरवात करण्यात येणार असून राज्यातून नागपूर, संभाजीनगर व मुंबई येथून मे महिन्यात रेल्वे सोडण्यात येणार आहे. वर्धा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी या योजनेची जनजागृती करुन जास्ती जास्त नागरिकांना कसा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करावे किमान 800 लार्भार्थ्यांचे नियोजन करावे, अशा सुचना संजय शिरसाट यांनी दिल्यात.
बऱ्याचशा शाळेत मुलांना शिकविण्यासाठी शिक्षकांची कमतरता आहे. रोबोटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी योजना प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. यासाठी प्रायोगिक तत्वावर नागपूर येथून हा उपक्रम लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे शिरसाट म्हणाले. तसेच सामाजिक न्याय विभागाच्या निधीमधून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांचे एआयच्या माध्यमातून सर्वेक्षण करा. आवश्यक असणाऱ्या निधीचा तातडीने प्रस्ताव सादर करा, असे त्यांनी सांगितले.
*विद्यार्थ्यांसाठी वातानुकूलित अभ्यासिक मंजूर करावी – डॉ.पंकज भोयर*
मागसवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वसतीगृहांची क्षमता वाढवून दिली तसेच नवीन दोन मुलींची वसतीगृह इमारत मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सामाजिक न्यायमंत्र्यांचे आभार मानले. सामाजिक न्याय भवनाच्या इमारतीवर वर्धेतील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज आणि वातानुकूलित अभ्यासिका मंजूर करावी. वर्धा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पुढील विकासासाठी आणि देखभालीसाठी विशेष निधीची तरतूद करावी. अशा मागण्या पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.



