रामनगर वासियांना मिळाला मालकी हक्काचा आधार! _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर
पालकमंत्र्यांच्याहस्ते लीज भुखंड धारकांना फ्रिहोल्ड प्रमाणपत्र वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : रामनगर परिसरातील नागरिकांसाठी ऐतिहासिक दिवस आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला भूखंडांच्या नूतनीकरणाचा आणि मालकी हक्काच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न मार्गी लागला. रामनगर वासियांना मालकी हक्काचा आधार मिळाला, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
नगाजी महाराज देवस्थान वर्धा येथे नगर परिषदेच्यावतीने रामनगर वासियांना लीज भुखंड धारकांना फ्रिहोल्ड प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, मुख्याधिकारी विजय देशमुख, नगरसेवक संतोष ठाकूर, निलेश किटे, राखी पांडे, प्रियंका खंगार आदी उपस्थित होते.
रामनगर परिसरातील भूखंडांची लीज 1930 पासून सुरू झाली होती. ती संपल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची कमतरता आणि कायद्यातील तरतुदींअभावी नागरिकांना मालकी हक्क मिळण्यात अडथळे येत होते. ही समस्या सोडवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रीमंडळ बैठकीमध्ये विशेष मंजुरी देण्यात आली. राज्य मंत्रिमंडळाने ऐतिहासिक निर्णय घेत नाममात्र दरात मालकी हक्क देण्याचे धोरण निश्चित केले असल्याचे पालकमंत्री डॉ.भोयर म्हणाले.
राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलत कोणत्याही जाचक अटी न ठेवता रामनगर लीज भुखंड धारकांचे फ्रीहोल्ड करण्याचा निर्णय घेतला. या कामासाठी कोणत्याही नागरिकाला कोणालाही एक पैसाही देण्याची गरज नाही. सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जात आहे. नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे भाग्याचे असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांना सरकारच्या योजनांचा आणि निधीचा थेट फायदा मिळवून देणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. रामनगरच्या या विकासामुळे शहराच्या प्रगतीला एक नवी दिशा मिळेल. नगराध्यक्ष, मुख्याधिकारी आणि नगरपालिकेच्या संपूर्ण टीमचे कौतुक पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी केले. बोलताना, जुन्या आठवणींना उजाळा देत, स्वर्गीय दत्ताजी मेघे आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने हा प्रश्न मार्गी लावता आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष सुधीर पांगूळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, माजी नगराध्यक्ष संतोष ठाकूर यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्याहस्ते प्रातिनिधिक स्वरुपात फ्रीहोल्ड प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास रामनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्यंने उपस्थित होते.



