ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नियमबाह्य रेती वाहतुकीचा बळी; श्रीकांत राजूरकर कायमचे अपंग – पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्या

उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील तरुण श्रीकांत राजूरकर यांना नियमबाह्य रेती वाहतुकीमुळे भीषण अपघाताचा सामना करावा लागला असून या घटनेत तो कायमस्वरूपी अपंग झाला आहेत. या गंभीर प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दिनांक 27 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 6:30 वाजताच्या सुमारास निमणी–बाखर्डी मार्गावर भरधाव वेगाने रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने श्रीकांत राजूरकर यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन कवटी तुटली व मेंदूला मार लागल्याने तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली.

याशिवाय ट्रॅक्टर त्यांच्या शरीरावरून गेल्याने हाताच्या दोन बोटांना गंभीर फ्रॅक्चर झाले, छातीला जबर मार लागला, तसेच उजवा पाय कापावा लागला. या घटनेमुळे त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. सध्या त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आतापर्यंत सुमारे ५ लाख रुपयांचा खर्च झाला असून पुढील उपचारांसाठी मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे.

या घटनेनंतर श्रीकांत यांचे वडील गजानन गणपती राजूरकर यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांना निवेदन देत तात्काळ आर्थिक मदत देण्याची व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 रेती घाटातील गैरव्यवहार पुन्हा उघडकीस

या अपघातामुळे भारोसा घाटातील रेती उत्खनन व वाहतुकीतील गंभीर अनियमितता समोर आली आहे. मागील दोन महिन्यांपासून घरकुल योजनेअंतर्गत मोफत रेतीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू असल्याचे समोर येत आहे.

माहितीनुसार –

अनेक ट्रॅक्टरची अधिकृत नोंद नाही

वाहनांचे पासिंग व विमा (इन्शुरन्स) नसताना वाहतूक सुरू

काही ट्रॅक्टर विनानंबर चालवले जात आहेत

एकाच टीपीवर जास्त प्रमाणात (४ ते ५ ब्रास) रेती वाहतूक

संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी व चालक यांच्यात संगनमताचे आरोप

घाटावर सीसीटीव्ही यंत्रणा नसल्यामुळे नियंत्रणाचा अभाव

या सर्व प्रकारांमुळे भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रॅक्टरमुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

 प्रशासनाकडे ठोस मागण्या

या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून खालील मागण्या करण्यात येत आहेत:

संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करावी

दोषी अधिकारी व संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी

नियमबाह्य रेती वाहतूक तात्काळ बंद करावी

श्रीकांत राजूरकर यांना तातडीने शासकीय आर्थिक मदत द्यावी

कुटुंबातील एका सदस्याला शासकीय सेवेत समाविष्ट करावे

 एका तरुणाचे उद्ध्वस्त झालेले आयुष्य

या दुर्दैवी अपघातामुळे एका कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून एका तरुणाचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ न्याय देणे आवश्यक असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. यावेळी प्रा आशिष देरकर अभय मुनोत उमेश राजुरकर गणेश लोंढे गजानन राजुरकर नागेश तिखट आदी उपस्थित होते.

एकीकडे ‘घरकुल’ या पवित्र नावाचा आडोसा घ्यायचा आणि दुसरीकडे रेतीची अवैध तस्करी करत एकाच टिपीवर अनेक चकरा मारायच्या नादात हा अपघात झाला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

     उमेश राजुरकर माजी अध्यक्ष, संजय गांधी निराधार समिती कोरपना

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये