ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोंडपिंपरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तहसीलदारांना पुराव्यानिशी निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील व्यंकटपूर येथील सर्वे क्र. १६२ मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध गौण खनिज उत्खनन आणि साठवणूक होत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (सामाजिक न्याय विभाग) वतीने गोंडपिपरीचे तहसीलदार शुभम बहाकर यांना पुराव्यानिशी निवेदन सादर करण्यात आले असून, दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भालचंद्र बोधलकर याने व्यंकटपूर परिसरातील सर्वे क्र. १६२ मधून ‘मुरूम’ या गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणावर अवैद्य उत्खनन केले आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, संबंधित इसमाने केवळ १०० ब्रास उत्खननाची रितसर परवानगी घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात नियमांचे सर्रास उल्लंघन करून त्या ठिकाणी ५०० ते ६०० ब्रास इतक्या मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, रॉयल्टी चुकवण्यासाठी महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ फेकून तोहगाव व लाठी च्या रॉयल्टी पासचा (T.P.) वापर या अवैध उत्खननासाठी केला जात असल्याचा गंभीर आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. हे उत्खनन केलेले अतिरिक्त मुरूम गोंडपिंपरी परिसरातील चिंतामणी कॉलेजच्या बाजूला असलेल्या एका खाजगी ले-आउटमध्ये टाकले जात असल्याचे उघड झाले आहे. या ले-आउटमध्ये केवळ मुरूमच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात रेती आणि विटांचा साठा देखील करण्यात आला असून तो साठा सुद्धा अवैध असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सर्व प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाची देखील मोठी हानी होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुणाल मारोतराव गायकवाड यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले. या निवेदनासोबत अवैध उत्खननाचे आणि ले-आउटवर पसरवलेल्या मुरुमाचे फोटो पुराव्यादाखल जोडण्यात आले आहेत. “या प्रकरणाचा तातडीने पंचनामा करून ले-आउट धारक आणि उत्खनन करणाऱ्या संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. आता या पुराव्यांनंतर तहसील प्रशासन याकडे गांभीर्याने बघून काय कारवाई करते, याकडे संपूर्ण गोंडपिंपरी तालुक्याचे लक्ष लागले आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि उपविभागीय अधिकारी गोंडपिंपरी यांनाही माहितीसाठी पाठवण्यात येणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये