ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दोन अल्पवयीन बहिणींचा बालविवाह थांबविण्यात यश

महिला व बाल विकास विभाग व स्वयंसेवी संस्थेची सतर्कता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : सुकळी बाई येथे दोन अल्पवयीन बहिणींचा बाल विवाह होत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास प्राप्त झाली होती. महिला व बालविकास कार्यालय तसेच स्वयंसेवी संस्थेच्या सतर्कतेमुळे हे बालविवाह थांबविण्यात आले आहे.

बालविवाहाची माहिती प्राप्त होताच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंगी पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षकांना माहिती देण्यात आली. बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, सहाय्यक बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी, अंगणवाडी सेविका यांनी बालिकेच्या जन्म नोंदणीचा तपास घेतला असता सदर बालिका 18 वर्षाच्या आत असल्याचे दिसून आले. हा बालविवाह हनुमान मंदिर देवस्थान, सुकळी बाई येथे सुरु असल्याची माहिती मिळाल्यामुळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी यांनी पोलिस विभागाचे तत्काळ सहकार्य घेवून विवाहस्थळी भेट दिली.

यावेळी पोलिस उपनिरिक्षक युवराज राठोड यांच्या सहकार्याने आकोलीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रविण आत्राम व सुकळी बाईचे योगेश घुगे तसेच चाईल्ड लाईनचे प्रकल्प समन्वयक आशिष मोडक, सुरज वानखेडे, माधुरी शंभरकर, जयश्री निवल, आकोली येथील रंजना गोमासे व सुकळी बाई येथील मीरा वरठी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर नम्रता खैरकार, पोलिस कर्मचारी शरद धोगडे, पोलिस पाटील देवराज करलूके, आकाश सोनुले, विलास भेंडे, ग्रामिण मुक्ती समस्या ट्रस्टचे प्रतिनिधी संतोष ढोणे, वैभव भांदकर, स्वराज मित्र संस्थेचे धनराज कोल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर बालविवाह थांबविण्यात आला.

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी मुलगा व मुलीचे आई वडील आणि इतर नातेवाईक यांना विवाहस्थळी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय विवाह करणार नाही, असा जबाबनामा लिहून घेतला. यासोबतच मुलीचा विवाह 18 वर्षाच्या आत करण्याचा प्रयत्न केला तर बाल विवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, अशी ताकीद देण्यात आली.

सदर बालिकेला ग्रामपंचायत अधिकारी यांच्या माध्यमातून बाल कल्याण समिती येथे सादर करण्याबाबत बालिकेच्या आई व वडीलांना सांगितले. गावामध्ये बाल विवाह होत असल्यास गावातील नागरीकांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, पोलिस विभाग यांना माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये