ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघांची भूमी असलेला विदर्भ आता पहेलवानांची भूमी म्हणून उदयास येतोय _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे ग्रीको-रोमन महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

चांदा ब्लास्ट

२०३६ च्या ऑलिम्पिकचे उद्दिष्ट्य डोळ्यापुढे ठेवून चंद्रपूरमध्ये क्रीडा क्षेत्राचा होतोय विकास

चंद्रपूर :- संपूर्ण देशात विदर्भ हा वाघांची भूमी म्हणून ओळखला जातो. पण आता आपला विदर्भ पहेलवानांची भूमी म्हणूनही ओळख निर्माण करू लागला आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील देवळी येथे आयोजित दुसरी ग्रीको-रोमन महाराष्ट्र केसरी किताब लढत तसेच वरिष्ठ गट ग्रीको-रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील विदर्भ केसरी खासदार श्री. रामदासजी तडस इनडोअर स्टेडियममध्ये हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार, देवळी- पुलगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजेश बकाने, स्पर्धेचे आयोजक,माजी खासदार रामदास तडस, विधान परिषदेचे आमदार दादारावजी केचे, देवळी नगराध्यक्ष किरण ठाकरे, उपाध्यक्ष राहुल चोपडा, विदर्भ केसरी डॉ. संजय तीरथकर, गटनेता उमेश कामडी, माजी नगराध्यक्षा शोभाताई तडस, माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे, सुरज पेदुलवार, नगरसेवक रवी लोणकर, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफार, वर्धा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मदन चौरे तसेच देवळी येथील सर्व नगरसेवक, नगरसेविका नगर परिषदेचे सभापती तसेच खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हनुमानजी प्रभू रामांचे परम भक्त असून ते शक्ती, पराक्रम आणि निष्ठेचे प्रतीक आहेत. कुस्ती हा देखील शक्ती, साहस आणि जिद्दीचा खेळ असल्याने अशा पवित्र प्रतिकांच्या साक्षीने येथे आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा अधिक प्रेरणादायी ठरते. या उत्कृष्ट उपक्रमासाठी श्री. तडस यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक.’ या स्पर्धेमध्ये ४०० पहेलवान सहभागी होत असल्याची बाब अत्यंत अभिमानाची आहे, असेही ते म्हणाले.

‘रामायणातही कुस्तीचा उल्लेख आढळतो, तर महाभारतात भीमाला कुस्तीचे प्रतीक मानले गेले आहे. मात्र आधुनिक भारतात हळूहळू कुस्तीबद्दलचे प्रेम कमी होत चालल्याचे दिसून येते. ऑलिम्पिक स्पर्धांचा इतिहास पाहिला, तर भारताने मिळवलेल्या एकूण ३५ पदकांपैकी तब्बल ०८ सुवर्णपदके कुस्तीमधून मिळालेली आहेत. यावरून स्पष्ट होते की, देशाचा गौरव उंचावण्यात कुस्ती या खेळाचे मोलाचे योगदान राहिले आहे,’ याचाही आ.मुनगंटीवार यांनी आवर्जून उल्लेख केला.

आ. मुनगंटीवार म्हणाले, अर्थमंत्री असताना अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याची पारंपरिक दृष्टी बदलण्याचा मी प्रयत्न केला. माती, मैदान आणि मॅट यांच्या माध्यमातूनच सक्षम, निरोगी आणि शिस्तबद्ध खेळाडू घडवून समाजाचे आरोग्य बळकट करता येते, अशी माझी ठाम भूमिका होती.

आज देशातील लोकांची खेळांप्रतीची रुची बदलत चालली आहे. क्रिकेट हा सर्वात लोकप्रिय खेळ बनला आहे, पण कुस्तीला आजही लोकमान्यता आहे. मात्र या खेळाला अधिक व्यापक राजमान्यता आणि आर्थिक बळ मिळाले, तर महाराष्ट्राच्या मातीतला हा रांगडा खेळ केवळ ताकद आणि शक्तीचेच नव्हे, तर संयम, शिस्त आणि बुद्धिमत्तेचेही प्रतीक ठरेल.’१९५२ च्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकून भारताचा झेंडा अभिमानाने उंचावला.‘भारतीयांना आजही कुस्तीविषयी अपार प्रेम आहे. देवळी येथे आयोजित कुस्ती स्पर्धा भविष्यातील कुस्तीगीरांना योग्य दिशा देणाऱ्या ठरतील आणि कुस्तीची दशा बदलविणारे केंद्र म्हणून विकसित होतील,’ अशा सदिच्छा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

‘अर्थसंकल्पात कुस्तीसाठी निधीची तरतूद आवश्यक’

महाराष्ट्रात सर्वांनी एकत्र येत जूनच्या अधिवेशनात विधानसभेत या विषयावर विशेष चर्चा घडवून आणत, डीपीडीसी, महानगरपालिका व जिल्हा परिषदांच्या अर्थसंकल्पामध्ये अशा स्पर्धांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, तर गावागावांत आजही मोठ्या संख्येने खेळावर प्रेम करणारे सक्षम खेळाडू घडू शकतात. यामुळे भविष्यात हेच खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकून ऑलिम्पिकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची आन, बान आणि शान उंचावत सुवर्णपदक मिळवू शकतील. “दिल्लीचेही तक्त राखितो महाराष्ट्र माझा” या ओळींना साजेसे कार्य करत, महाराष्ट्र क्रीडा क्षेत्रातही आपली मान अभिमानाने उंचावेल,’ असा विश्वास आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

‘वाघांच्या भूमीतून ऑलिम्पिक विजेते घडविण्याचा संकल्प’

२०३६ च्या ऑलिम्पिकचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून चंद्रपूरमध्ये क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. तब्बल १३७ कोटी रुपयांच्या निधीतून वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक स्टेडियम उभारले जात असून, त्यासाठी आतापर्यंत ८५ कोटी रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे, अशी माहिती आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.विदर्भ ही जगातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेली भूमी म्हणून ओळखली जाते. त्या वाघाच्या पराक्रमाचा वारसा घेऊन येथील युवकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडत ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणे, हीच खरी अपेक्षा आहे. चंद्रपूरच्या भूमीतून भविष्यात देशासाठी सुवर्णक्षण निर्माण करणारा खेळाडू घडला पाहिजे, हीच प्रेरणा या उपक्रमामागे आहे. ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून अभिनव प्रयोग करत 17 ते 18 वर्षे वयोगटातील युवकांना आठ महिन्यांचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणातून घडलेल्या खेळाडूंनी ऐवरेस्ट शिखर सर करत भारताचा गौरव वाढविला, असेही त्यांनी नमूद केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये