आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शिक्षक परिषदेत मांडला संवाद, संघर्ष आणि समाधानाचा त्रिसूत्री दृष्टिकोन
विदर्भ विभागीय अधिवेशनात शिक्षकांच्या समस्या, अपेक्षा व शैक्षणिक आव्हानांवर सखोल चर्चा

चांदा ब्लास्ट
आ.मुनगंटीवार यांचे शिक्षक परिषदेच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचे आश्वासन; लवकरच विशेष बैठकीचे आयोजन
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाच्या विदर्भ विभागीय अधिवेशनाला संबोधित केले. यावेळी त्यांनी शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर भाष्य करत ‘संवाद, संघर्ष आणि समाधान’ या त्रिसूत्री दृष्टिकोनाची स्पष्ट मांडणी केली. शिक्षकांच्या न्याय्य मागण्या तसेच बदलत्या शैक्षणिक आणि तांत्रिक आव्हानांचा विचार करत, संवादाच्या माध्यमातून तोडगा शोधण्याला प्राधान्य दिले पाहिजे; मात्र आवश्यकतेनुसार संघर्षाचीही भूमिका स्वीकारत शेवटी समाधानाकडे वाटचाल करणे गरजेचे आहे, असे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले.*
चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक 28 आणि 29 मार्चला आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभागाच्या विदर्भ विभागीय अधिवेशनाचे अध्यक्ष अजय वानखेडे, माजी शिक्षक आमदार नागो गाणार, माजी आमदार सुधाकरराव कोहळे, राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, पूजाताई चौधरी, सुभाष गोतमारे, विलास खोंड, विनोद पांढरे, रंजनाताई कावळे कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिक्षक, शिक्षिका आदींची उपस्थिती होती.
चंद्रपूर ही माता महाकालीची पावन भूमी असून, या भूमीतून प्रेरणा, सेवा आणि पराक्रमाची ऊर्जा घेऊन शिक्षकांनी समाजात परिवर्तन घडवावे, अशी अपेक्षा आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. जगातील १९३ देशांपैकी केवळ १४ देशांत वाघ आहे आणि त्यातील सर्वाधिक वाघ भारतात असून त्यामध्ये देशात सर्वात जास्त वाघ चंद्रपूर जिल्हात आहे, याचा उल्लेख करत त्यांनी शिक्षकांनीही वाघाच्या धैर्याने आव्हानांना सामोरे जावे, असे आवाहन केले.
चंद्रपूर जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करताना आ. मुनगंटीवार म्हणाले की, आनंदवनासारख्या सेवा कार्याच्या प्रेरणास्थानामुळे आणि चंद्रपूर येथील थर्मल पॉवर प्रकल्पामुळे राज्यातील अंधार दूर करणारी ही भूमी एक वेगळी ओळख निर्माण करते. या जिल्ह्याच्या प्रेरणेतून अधिवेशनातून जाताना शिक्षण क्षेत्रातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न प्रत्येकांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
इतिहासातील चंद्रपूर जिल्ह्याच्या योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी भारत-चीन युद्धाच्या काळात सर्वाधिक सुवर्णदान करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख अधोरेखित केली. या जिल्ह्याचे हृदय सोनेरी असल्याचे सांगत, येथून शिक्षकांनी सेवाभाव, संवेदनशीलता आणि राष्ट्रहिताचा संस्कार घेऊन जावे, अशी भावनिक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बदलत्या काळात दर काही वर्षांनी नवी आव्हाने उभी राहत असून आजच्या युगात तंत्रज्ञान विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) शिक्षण क्षेत्रावर प्रभाव टाकत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक असला तरी त्याच्या आहारी न जाता संस्कार, मूल्ये आणि मानवी संवेदनांचा आधार कायम ठेवणे गरजेचे आहे, असे आ.मुनगंटीवार म्हणाले.
“मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव” या मूल्यांना जपताना “यंत्र देवो भव” होऊ नये, यासाठी शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शिक्षक परिषद ही संघटना नेहमी व्यक्तीहितापेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देणारी असून “पहिले राष्ट्रहित, नंतर परिषद आणि शेवटी मी” या तत्वावर कार्य करत असल्याचे सांगत, शिक्षक परिषदेच्या प्रत्येक न्याय्य मागणीसाठी आपण खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास आ.मुनगंटीवार यांनी दिला.
*राज्यमंत्र्यासोबत शिक्षण समस्यांवर बैठक*
शिक्षण क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी लवकरच चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, शिक्षण विभागाचे सचिव श्री. देओल, शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि सर्व संबंधितांच्या उपस्थितीत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
*शिक्षकांची भूमिका महत्वाची*
शिक्षकांमधील एकता, आपुलकी, सहकार्य आणि मानवतेची भावना जपण्याचे आवाहन करत, शिक्षण हा केवळ व्यवसाय नसून संस्कार घडविण्याचे पवित्र कार्य आहे, हा भाव कायम ठेवण्याचे आ.मुनगंटीवार यांनी सांगितले. पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचेही त्यांनी नमूद केले.
*यावेळी* *प्रमुख* *अतिथी* *म्हणून* *माजी* *शिक्षक* *आमदार* *नागो* *गाणार* यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी नविन पिढीतील नवनियुक्त शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक संघटनेशी प्रत्यक्ष जुळवून विचार मंथन करावे.
आज शिक्षक संघटनेला अधिक बळकट करण्याची गरज आहे.
अन्यथा भविष्यात मराठी माध्यमाच्या शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवणे कठीण होणार आहे. त्याची झळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाच बसणार अशी परिस्थिती निर्माण होते आहे.
शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संघटना बळकट करण्याची आणि विश्वासनिय नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे.यासाठी शिक्षक बांधवांनी प्रयत्न करावे.
असे मत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी आमदार सुधाकर कोहळे, राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडु , राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विभाग अध्यक्ष अजय वानखेडे यांनी उपस्थितांना मोलाचं मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन वैशाली तनके , प्रास्ताविक विभाग उपाध्यक्ष विनोद पांढरे तर आभारप्रदर्शन संयोजक विलास खोंड यांनी केले.
या दोन दिवसांच्या अधिवेशनाला विदर्भातील मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी वंसत वडस्कर, विपीन मानकर, विवेक आंबेकर, दिलीप मॅकलवार,विठ्ठल राजुरकर, संतोष सोनवणे, सरीता सोनकुसरे, संजय उपाध्ये, देविदास चवले आणि ईतर पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.



