स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे नवव्या स्मृतिगंध काव्यसंमेलनात स्वच्छतेचा सत्कार
कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती गवराळाच्या कार्याचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान भद्रावती तर्फे दिनांक २९ रोज रविवारला स्व. मुरलीधर पा. गुंडावार लॉन येथील स्व. आचार्य ना. गो. थुटे स्मृती मंचावर नववे स्मृतिगंध काव्य संमेलन पार पडले.
अनेक साहित्यिक व कवींचा सहभाग असणारे हे संमेलन रसिकांना काव्याची अपूर्व मेजवानी होती.
सदर काव्यसंमेलनाचे उद्घाटन नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांच्या हस्ते संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष म्हणून ज्येष्ठ कवी व प्रख्यात रेखा चित्रकार प्रमोदकुमार अनेराव , प्रमुख अतिथी डॉ. अजय देशपांडे, डॉ. किशोर कवठे,गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश महाकाळकर, प्रा. पुनीत मातकर, डॉ. प्रकाश वटी, सामाजिक कार्यकर्ते विशाल गावंडे, विदर्भ साहित्य संघाचे इरफान शेख आदी उपस्थित होते.
काव्यरसिकांच्या उपस्थितीत याप्रसंगी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध विभूतींचा सन्मान करण्यात आला.
स्वीकृत नगरसेवक राजेश बदखल, अवघ्या २३ व्या वर्षी भरघोस मतांनी विजयी उमेदवार प्रथम संदेश गेडाम, अवघ्या एका मताने निवडून आलेल्या नगरसेविका वृषाली पांढरे आदीं सह गणपती वॉर्ड गवराळा येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ गवराळा संचालित कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समिती च्या अविरत निःस्वार्थ स्वच्छतेच्या अभियानाची दखल घेत विशेष सत्कार करण्यात आला. जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ व कर्मयोगी गाडगे महाराज स्वच्छता समितीचे मुख्य प्रवर्तक, संघटक प्रा. लिमेश माणूसमारे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. प्रसंगी आपल्या मनोगतातून त्यांनी गाडगे महाराजांचे विचार फक्त विचारात न ठेवता सर्वांनी आचरणात आणण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. विणा आडेकर स्मृती प्रतिष्ठान च्या कार्याचा गौरव करीत अशा आयोजनातून नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध होऊन साहित्य अधिक समृद्ध होण्यास प्रोत्साहन मिळते असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्र संचालन अष्टपैलू प्रा. डॉ. सुधीर मोते तर आभार प्रदर्शन प्रा. विवेक सरपटवार यांनी केले.
विदर्भातील अनेक कवी, व गजलकार यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. नवोदितांना व्यासपीठ उपलब्ध झाल्याने त्यांचा प्रतिभेला वाव मिळून रसिकांची दाद मिळाली.
संयोजक प्रवीण आडेकर यांच्या अथक प्रयत्नाचे फलित म्हणजे सलग नवव्या वर्षी साजरा होणारा हा स्मृतिगंध असाच चिरंतर दरवळत राहो अशी कामना करीत एक दिवसीय काव्य संमेलनाची सांगता करण्यात आली.



