ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चेकगोजोलीतील पांदण रस्त्याला तारेचे कुंपण

प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष ; शासन निर्णयाचा विसर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

ग्रामपंचायत गोजोली मक्ता अंतर्गत चेकगोजोली गावातील शेतकऱ्यांना सोयीचा असलेल्या पांदण रस्त्याला स्थानिक तरुणाने स्वतःची जागा समजून तारेचे कुंपण केल्याने, शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर विषयावर ग्रामपंचायत आणि तालुका प्रशासनाकडून कोणतीही दखल न घेतल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत गोजोली मक्ता अंतर्गत चेकगोजोली गावातील शेतकऱ्यांना आपल्या शेताकडे जाण्यासाठी १५ वर्षापूर्वी स्थानिक मजुरांकडून पांदण रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्याने शेतकऱ्यांची वहिवाट सुरू आहे. तसेच याच पांदण रस्त्याने स्मशानभूमीकडेही जाणे सोयीचे होते. मात्र अचानक येथील एका तरुणाने स्वतःची जागा समजून, कोणत्याही प्रकारे जागेची मोजणी न करता तारेचे कुंपण केल्याने शेतकऱ्यांनि आश्चर्य व्यक्त केले असून प्रशासनाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.
विशेष म्हणजे, या पांदण रस्त्याला लागूनच जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा सुरू आहे. या शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांसाठी राखीव आहे. या शाळेला संरक्षक भिंतीची मागणी करण्यात आली असून, ती लवकरच पूर्ण होणार असल्याने शाळेच्या आवारातून कोणालाच स्मशानभूमीकडे किंवा शेताकडे जाता येणार नाही. ज्यामुळे शेतकऱ्यांची मोठी फजिती होणार आहे. याच परिसरात यापूर्वी दलीत वस्ती सुधार योजनेतून सिमेंट काँक्रिट रस्ता बांधकाम करण्यात आले, त्याही वेळेस पांदण रस्ता कुंपण करणाऱ्या तरुणाने रस्ता बांधकामास आडकाठी आणली होती आणि आता तर चक्क पांदण रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावरच तारेचे कुंपण केल्याने, शेतकऱ्यांनि आता काय करावे?, हा प्रश्न पडला आहे.

*”त्या” तरुणाला कोणाचा आशिर्वाद..?*

ज्या तरुणाने स्वतःची जागा समजून पांदण रस्त्याला तारेचे कुंपण केले, ती जागा नेमकी कोणाची?, हा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. कारण पांदण रस्त्याला लागूनच ख्रिश्चन मिशनरी ची जागा असून त्यांनी पांदण रस्त्याकरिता जागा दिली आहे. मात्र सदर तरुणाने या जागेची कोणतीही शासकीय मोजणी न करता ग्रामपंचायतच्या नालीसह कुंपण केल्याने, कोणत्या अधिकाऱ्यांच्या किंवा राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने हे काम करण्यात आले, हे ग्रामस्थांना कळेनासे झाले आहे.

*शासन निर्णयानुसार कारवाई करण्याची मागणी*

पांदण रस्त्याच्या संदर्भात शासनाने नुकताच एक निर्णय घेतला असून, “शेत व पांदण रस्ते अडविणारे सरकारी योजनांपासून पाच वर्षासाठी अपात्र होणार असून, त्या व्यक्तीचे आधार कार्ड आणि फॉर्मर आय डी ब्लॉक करण्यात येणार आहे.” या शासन निर्णयानुसार सदर तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

*प्रशासक सुट्टीवर, सचिव मिटिंगमध्ये*

आर्थिक वर्षाच्या सरतेशेवटी मार्च महिन्यात अनेक कामे प्रशासनाकडून मार्गी काढण्यात येतात. मात्र ग्रामपंचायत गोजोली मक्ता येथील प्रशासक मागील एक आठवड्यापासून कार्यालयातच नसल्याने, ग्रामस्तरावरील अनेक कामे खोळंबली आहेत. तसेच ग्रामपंचायत सचिव यांच्याकडे तीन ग्रामपंचायतीचा प्रभार असल्याने, त्या नेहमी कार्यालयात कमी तर तालुक्याच्या मिटिंगमध्येच व्यस्त असल्याचे सूत्रानुसार कळते. यामुळे ग्रामपंचायत गोजोली मक्ता येथील विकासकामांचा बट्ट्याबोळ झाल्याचे दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये