ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बहुमताचा अपमान, बैमानीचा कळस आणि हुकूमशाहीचा उदय!

सभागृह नेतेपदाच्या निर्णयावर भाजपमध्ये तीव्र संताप”

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महानगरपालिकेतील सभागृह नेतेपदाच्या निवडीवरून भारतीय जनता पक्षात तीव्र नाराजी, संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे. तब्बल ३२ पैकी २६ नगरसेवकांनी गटनेते चंद्रशेखर शेट्टी यांनाच सभागृह नेता म्हणून नियुक्त करण्याची एकमुखी मागणी केली होती. यासंदर्भात अधिकृत निवेदन महापौरांकडे सादर करण्यात आले होते.

गटनेताच सभागृह नेता असतो हीच सर्व महापालिकांमध्ये भाजपची स्पष्ट परंपरा आणि संघटनात्मक पद्धत राहिली आहे. मात्र या परंपरेला पूर्णपणे बगल देत महापौर संगीता खांडेकर यांनी बहुसंख्य नगरसेवकांच्या ठाम भूमिकेला न जुमानता जयश्री जुमडे यांच्या नावाची घोषणा केली. या निर्णयामुळे पक्षांतर्गत लोकशाही प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष तथा नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांनी या निर्णयावर कडाडून टीका करत म्हटले की, “हा केवळ बहुमताचा अपमान नाही, तर पक्षाच्या लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे. २६ नगरसेवकांची एकमुखी भूमिका असताना त्यांच्या मतांना डावलणे म्हणजे नगरसेवकांचा विश्वासाचा विश्वासघात आहे.

ते पुढे म्हणाले, हा निर्णय हुकूमशाही पद्धतीचा नमुना आहे. पक्षात सामूहिक नेतृत्व, चर्चा आणि सहमती यांना महत्त्व असते. मात्र येथे त्या सर्व प्रक्रियांना धाब्यावर बसवून एकतर्फी हुकुमशाही रित्या निर्णय घेण्यात आला. हा प्रकार अत्यंत चिंताजनक आहे.”

अशा प्रकारच्या निर्णयांचा थेट परिणाम पक्षसंघटनेवर होतो. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आणि नाराजी वाढते, नेतृत्वावरील विश्वास कमी होतो आणि संघटनात्मक एकजूट ढासळण्याची भीती निर्माण होते. जेव्हा बहुमताचा सन्मान राखला जात नाही, तेव्हा तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होतो आणि पक्षाची ताकद कमजोर होते, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच, हा प्रकार पक्षीय शिस्तीचा उघड भंग असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आज घेतलेला हा निर्णय उद्या चुकीचा पायंडा ठरू शकतो. जर अशा पद्धतीने निर्णय घेतले गेले, तर भविष्यात पक्षात गोंधळ, गटबाजी आणि अंतर्गत संघर्ष वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

या संपूर्ण प्रकरणामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील भाजपमध्ये अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले असून, याचा परिणाम केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर आगामी राजकीय समीकरणांवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये