ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एमएसईबीचा भोंगळ कारभार

यूनियन बँक मुख्य शाखेची वीज तोडून जनतेला त्रास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : एमएसईबीच्या भोंगळ व निष्काळजी कारभारामुळे Union Bank of India, मुख्य शाखा वर्धा येथील वीज कोणतीही पूर्वसूचना न देता तोडण्यात आल्याने ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. ही शाखा शहरातील महत्त्वाची शाखा असून येथे दररोज शेकडो नागरिक पैसे काढण्यासाठी येतात तसेच व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा करण्यासाठी येत असतो.

तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार ठप्प झाले. ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, पेन्शनधारक, व्यापारी व सामान्य ग्राहकांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागली.

सदर शाखेचे मुख्य कार्यालय व राष्ट्रभाषा विस्तार काउंटर असे दोन स्वतंत्र वीज मीटर आहेत. जानेवारी महिन्यात अनवधानाने राष्ट्रभाषा काउंटरच्या बिलावर ₹25,000 (₹20,000 मुख्य शाखा + ₹5,000 विस्तार काउंटर) इतकी रक्कम भरली गेली होती. त्यामुळे ₹20,000 अतिरिक्त रक्कम एमएसईबीकडे जमा असूनही दोन प्रलंबित बिले दाखविण्यात आली.

कालच शाखेकडून तत्काळ थकबाकी भरल्यानंतरही आज कोणतीही पूर्वसूचना न देता मुख्य शाखेची वीज तोडण्यात आली. राष्ट्रीयीकृत बँकेसारख्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थेची वीज तोडताना एमएसईबीने कोणतीही संवेदनशीलता दाखवली नाही.

या घटनेमुळे बँकिंग सेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्या असून जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अतिरिक्त भरलेली रक्कम असतानाही व कोणतीही पूर्वसूचना न देता वीज तोडणे हा एमएसईबीचा भोंगळ कारभार असून यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागला अशी प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी व भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, अशी मागणी करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये