बोर व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचा तीव्र विरोध

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक महेश ठेंगडी साहेब यांनी प्रकल्पग्रस्तांची सुनावणीसाठी पत्र काढले होते. मात्र, कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता तसेच प्रकल्पग्रस्त संघटनांना माहिती न देता ते कार्यालयातून अनुपस्थित राहिल्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
सुनावणीसाठी दूरवरून आलेल्या प्रकल्पग्रस्तांना अधिकारी अनुपस्थित असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी बोर व्याघ्र प्रकल्प कार्यालयासमोर जोरदार विरोध प्रदर्शन केले. “वारंवार सुनावणीच्या नावाखाली प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली जात आहे,” असा आरोप यावेळी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
या प्रसंगी प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, प्रशासनाकडून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून, सुनावणीची प्रक्रिया केवळ औपचारिकता बनली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये रोष निर्माण झाला आहे.
तसेच, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ उपस्थित राहून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या ऐकाव्यात व प्रलंबित प्रश्नांवर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला.



