शैक्षणिक सहलीतून विद्यार्थ्यांना शेती तंत्रज्ञानाची माहिती
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ.शेखर प्यारमवार
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथील एम.एस्सी.वनस्पतीशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही सहल प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
सदर सहल समर्थ एग्रो टुरिझम, फिस्कुटी येथे पार पडली. या सहलीचे समन्वयक म्हणून डॉ. सचिन चौधरी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच प्रा. देवीलाल वताखेरे व प्रा.स्मिता राऊत यांच्या सहकार्याने सहलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक शेती पद्धतींबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन देण्यात आले. विशेषतः फळ लागवड, पाणी व्यवस्थापन, भाजीपाला लागवड, ठिबक सिंचन प्रणाली तसेच विविध प्रकारच्या फुलांच्या लागवडीविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख झाली.
तसेच या सहलीत विद्यार्थ्यांनी वॉटर गेम्स आणि विविध साहसी क्रीडा प्रकारांचा आनंदही घेतला. त्यामुळे शैक्षणिक ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना मनोरंजन व अनुभवात्मक शिक्षणाचा लाभ मिळाला.
या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढण्यास मदत झाली असून प्रत्यक्ष शेती पद्धतींचा अनुभव घेण्याची संधी मिळाली. अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.



