ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पर्यावरणपूरक होळीची अनोखी परंपरा; कोची गावाचा महाराष्ट्राला आदर्श

कोची गावाची १६ वर्षांची पर्यावरणपूरक होळी परंपरा; परिसरातील ५० गावे घेत आहेत प्रेरणा

चांदा ब्लास्ट

भद्रावती (चंद्रपूर) :_ चंद्रपूर जिल्हा अंतर्गत भद्रावती तालुक्यातील कोची गावाने रंग, पाणी आणि प्रदूषणाला पूर्णपणे फाटा देत पर्यावरणपूरक होळी व धुलिवंदन साजरे करण्याची अनोखी परंपरा गेली १६ वर्षे जपली आहे. ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून आणि साधेपणातून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून ग्रामीण भागातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश दिला जात आहे.

होळी सण साजरा करताना रासायनिक रंगांचा वापर टाळून, पाण्याची उधळण न करता पारंपरिक पद्धतीने आणि सामाजिक ऐक्य जपत सण साजरा केला जातो. त्यामुळे पाण्याची बचत, प्रदूषणात घट आणि पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश समाजापर्यंत पोहोचत आहे.

‘ग्रामगीता’ प्रणित रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी कार्यक्रम २०११ पासून गावात सातत्याने पार पडत आहे. मा. सेवकराम दादा मिलमिले यांच्या पुढाकाराने या उपक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा आदर्श उपक्रम अधिक बळकट होत गेला आणि आज तो एक चळवळ बनला आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत संपूर्ण गावकरी, तसेच युवा वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

कोची गावाच्या या स्तुत्य उपक्रमाची दखल घेत यावर्षी परिसरातील सुमारे ५० गावेही रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यासाठी पुढे आली आहेत. ग्रामीण भागातून दिला जाणारा हा सकारात्मक संदेश संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

कोची गावाचा हा आदर्श उपक्रम समाजात एकात्मता, बंधुभाव आणि पर्यावरण जपण्याची जाणीव दृढ करणारा ठरत असून, ‘सण साजरा करतानाही पर्यावरणाचे भान ठेवता येते’ याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये