ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतीक्षेत्रात नाविन्यपूर्ण उत्पादनांसाठी शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सहकार्य करु – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

पालकमंत्र्यांचा प्रयोगशील युवा शेतकऱ्यांशी संवाद ; सेलू येथे १८ एकरवर प्रस्तावित कृषी मॉलचे सादरीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ पारंपरिक पिकांसोबतच जिल्ह्यातील अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करतांना दिसत आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. देश, विदेशात अधिक मागणी असणारे आणि कमी खर्चात उत्पादीत होणारी नाविन्यपूर्ण पिके घेण्यास जिल्ह्यातील शेतकरी इच्छूक असल्यास अशा शेतकऱ्यांचे क्लस्टर तयार करण्यासोबतच त्यांना सर्व प्रकारचे सहकार्य उपलब्ध करुन देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सेलू येथे १८ एकरवर प्रस्तावित कृषी मॉल उभारणीचे सादरीकरण तसेच वर्धा व सेलू तालुक्यातील प्रयोगशील युवा शेतकऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी संवाद साधतांना पालकमंत्री डॉ.भोयर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, बांधकामचे कार्यकारी अभियंता एकनाथ टिकले, जिल्हा परिषद बांधकामचे कार्यकारी अभियंता शुभम गुंडतवार तसेच कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

वर्धा व सेलू तालुक्यातील काही युवा शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत, पालकमंत्र्यांनी अशा शेतकऱ्यांकडून त्यांच्या प्रयोगाविषयी माहिती जाणून घेतली. विषमुक्त शेती करणारे शेतकरी, काही शेतकरी गावरान पपई, काही शेतकरी टरबूज, खरबूज, रसाचा ऊस, स्ट्रॉबेरी, चिया, अश्वगंधा, फुलशेतीत निशिगंधा सारख्या पिकांचे उत्पादन घेतात. ही पिके घेणारे शेतकरी एकत्र आल्यास त्यांचे क्लस्टर करु, त्यांना बियाणे, विक्री व्यवस्थेसाठी सहकार्य करु, असे पालकमंत्री म्हणाले.

सेंद्रिय कृषी उत्पादने व त्यांच्या उपयुक्ततेबाबत ग्राहकांना फारशी माहिती नाही. ग्राहक सेंद्रिय उत्पादनांचा पुरावा मागतात. त्यामुळे या उत्पादनांची तपासणी व प्रमाणपत्र वर्धेतच उपलब्ध व्हावे, अशी बाब शेतकऱ्यांनी उपस्थित केली. तशी व्यवस्था करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे प्रयोग इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा शेतकऱ्यांशी प्रत्येक महिन्यात संवाद बैठक, कार्यशाळा घेण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उत्पादने घेणाऱ्या शेतकऱ्यांची गावस्तरावर कृषी सहाय्यक मार्फत यादी तयार करावी. तसेच गावस्तरावर शेतकऱ्यांना कृषी योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिले.

*कृषी मॉल उभारणीचे सादरीकरण*

सेलू येथे कृषी विभागाच्या १८ एकर जागेवर कृषी मॉल उभारणीचे प्रस्तावित आहे. त्याचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. बियाण्यांपासून बाजारापर्यंत हा प्रकल्प जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक समृद्धीचा कणा ठरणार आहे. यामध्ये इनपुट प्लाझा, धान्य आणि तेलबिया प्रक्रिया विभाग, फलोत्पादन आणि क्षमता बांधणी, कोल्ड चेन इन्फ्रास्ट्रक्चर, लॉजिस्टिक आणि वाहतूक व्यवस्था, पब्लिक अ‍ॅमेनिटीज आणि बँकिंग, रिटेल आर्केड आणि बी-टू-सी दालन, शाश्वत ऊर्जा आणि सिंचन, सौर ऊर्जा प्रकल्प आदी राहणार आहे. या प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर पालकमंत्र्यांनी याबाबत शेतकऱ्यांच्या सूचना जाणून घेतल्या.

*प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार*

यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात रेशीम शेतकरी प्रांजल वाघमारे, स्ट्रॉबेरी उत्पादक भारती पाटील, कृषी मालावर प्रक्रिया करणारे सुनील खेडकर तसेच प्रयोगशील शेतकऱ्यांचे नाविन्यपूर्ण उपक्रम युट्यूबच्या माध्यमातून अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणारे युट्युबर राहुल वांदिले यांचा सत्कार करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये