तक्रारदारच निघाला तस्कर! ब्रह्मपुरीत रेती माफियांविरोधात महसूल विभाग ॲक्शन मोडवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती तस्करीने डोके वर काढले असतानाच, तहसीलदार सतीश मासाळ यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने धडक मोहीम उघडली आहे. या मोहिमेत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, रेती तस्करी थांबवण्यासाठी तहसीलदारांना निवेदन देणारा तक्रारदारच स्वतः अवैध रेती वाहतूक करताना रंगेहात पकडला गेल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मौजा कुर्झा येथे अवैध रेती उपसा आणि वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. तहसीलदार सतीश मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने तातडीने सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत रेतीची अवैध वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आला. तपासाअंती सदर वाहन कुर्झा वॉर्ड, ब्रह्मपुरी येथील रहिवासी सौरभ अनिल रामटेके यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले.
या कारवाईतील सर्वात चर्चेचा विषय म्हणजे सौरभ रामटेके यांची पार्श्वभूमी. काही दिवसांपूर्वीच रामटेके यांनी स्थानिक नागरिकांच्या सह्या गोळा करून अवैध रेती तस्करी थांबवण्याबाबत तहसील कार्यालयात निवेदन दिले होते. रेती तस्करी विरोधात सार्वजनिकरित्या भूमिका मांडणारी आणि प्रशासनाकडे कारवाईची मागणी करणारी व्यक्तीच आता स्वतः तस्करीच्या जाळ्यात अडकल्याने “बोले तैसा न चाले” अशी त्यांची अवस्था झाली आहे. या प्रकारामुळे परिसरात “दाखवायचे दात वेगळे आणि खायचे वेगळे” अशी चर्चा रंगली आहे.
महसूल विभागाने आपला मोर्चा केवळ कुर्झापुरता मर्यादित न ठेवता पूर्ण तालुक्यात विस्तारला आहे. दोन दिवसांपूर्वीच बेलपातळी येथील श्री. प्रफुल सहादेव मेश्राम यांचाही अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पथकाने जप्त केला होता. ही दोन्ही वाहने सध्या तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आली असून संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या कुर्झा येथील कारवाई मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी भूपेन गौरे, महसूल सेवक धनपाल बोरघरे व कर्मचारी तर बेलपातळी येथील कारवाईत ग्राम महसूल अधिकारी चंद्रकांत ठाकरे, घनश्याम राऊत आणि तुषार गिरडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. केवळ कागदोपत्री तक्रारी करून स्वतः अवैध धंदे करणाऱ्यांनाही या कारवाईतून मोठा धडा मिळाला आहे. येणाऱ्या काळात अशा कारवायांचे सत्र सुरूच राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
“पर्यावरण संरक्षण आणि शासकीय महसुलाची चोरी रोखण्यासाठी आमची मोहीम अधिक तीव्र केली जाईल. कोणताही मुलाहिजा न ठेवता अवैध उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करावे.”
— सतीश मासाळ, तहसीलदार, ब्रह्मपुरी.



