कोरपना तालुक्यात एमआयडीसी उभारणीला वेग; सर्वेक्षण अहवाल मागविला
आमदार देवरावदादा भोंगळे यांचा पुढाकार व ओम पवार यांच्या मागणीला यश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – औद्योगिकदृष्ट्या प्रगत मानल्या जाणाऱ्या कोरपना तालुक्यात तब्बल ३२ वर्षे उलटूनही महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची (एमआयडीसी) अधिकृत वसाहत उभारली गेली नव्हती. मात्र आता या प्रश्नाच्या हालचालींना वेग आला असून संबंधित विभागांकडून आवश्यक सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना यांना पत्र पाठवून तालुक्यात एमआयडीसी उभारणीसाठी आवश्यक प्राथमिक सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पत्रव्यवहारामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागणीला नवे बळ मिळाले आहे.
तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्याचे भौगोलिक स्थान उद्योगांसाठी पोषक मानले जाते. येथे आधीपासून विविध लघु व मध्यम उद्योग कार्यरत असले तरी अधिकृत एमआयडीसी नसल्याने मोठ्या उद्योगांच्या गुंतवणुकीला मर्यादा येत असल्याची भावना स्थानिकांकडून व्यक्त केली जात होती.
दरम्यान, *धानोलीचे उपसरपंच ओम पवार यांनी एमआयडीसी स्थापनेची मागणी करत राजुरा मतदारसंघाचे आमदार देवरावदादा भोंगळे* यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत *आमदार देवराव दादा भोंगळे* यांनी तात्काळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, नागपूर येथील महाव्यवस्थापकांशी पत्रव्यवहार करून आवश्यक निर्णय घेण्याबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावरून पंचायत समितीला अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
एमआयडीसीची निर्मिती झाल्यास कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात उद्योग येण्याची शक्यता असून स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा आशावाद व्यक्त होत आहे. तसेच परिसरातील कच्चा माल, वाहतूक सुविधा आणि सीमावर्ती स्थान यांचा औद्योगिक विकासाला मोठा फायदा होऊ शकतो.
सध्या पंचायत समिती स्तरावर प्राथमिक माहिती संकलन व सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा असून पुढील काही महिन्यांत याबाबत ठोस निर्णय होण्याची चिन्हे दिसत आहेत. एमआयडीसी उभारणीचा दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न मार्गी लागतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.



