२२ वर्षांनंतर पुन्हा उजळल्या शालेय आठवणी
माजी विद्यार्थी मेळाव्यात भावनिक क्षणांचा वर्षाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
तब्बल २२ वर्षांनंतर सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे सत्र २००३–२००४ च्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य मेळावा उत्साहात पार पडला. शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताच प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, डोळ्यांत आठवणी आणि मनात उत्सुकता दिसून येत होती. ज्या वर्गखोल्यांत कधीकाळी शिक्षण घेतले, त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मित्रमंडळी एकत्र आल्याने वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी स्व.मत्ते सर यांचे विद्यार्थ्यांच्या यशा मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे, शिस्तप्रिय आणि प्रामाणिक शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती, असे अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले
सरांचे साधेपण, विद्यार्थ्यांप्रती असलेले कर्तव्य ,ज्ञान यामुळेच ते आजही सर्वांच्या आठवणीत आहेत,विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणाऱ्या गुरुजनांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले. “सर्व शिक्षकांनी दिलेले संस्कार आणि शिस्त यामुळेच आम्ही आज विविध क्षेत्रात यशस्वी झालो,” अशी भावना अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
मेळाव्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते. काहींनी कविता सादर केल्या, काहींनी गीते गायली तर काहींनी शालेय जीवनातील प्रसंग सांगून जुन्या मित्रांसोबत काढलेले छायाचित्र, आठवणींना उजाळा दिला
शाळेच्या प्रगतीचा आढावा घेत भावी पिढीसाठी योगदान देण्याचा निर्धारही सर्वांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युनुस शेख, गुडू व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी चौधरी होते तर, प्रमुख अतिथी म्हणून गाडगे,ताकसांडे,बावनकर,बोधे, उलमाले,ढेगळे, पुंजेकर,गोपमवार,वासेकर,पाटील,लिलाधर मत्ते,प्रभाकर पुंजेकर, सिताराम पिपळशेडे, शशिकांत चन्ने यासह इतर प्रमुखाची उपस्थिती होती.



