तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धेत जिल्हा परिषद जिवती शाळेची उज्वल कामगिरी!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- पंचायत समिती जिवती आयोजित तालुकास्तरीय नवरत्न स्पर्धा पंचायत समिती सभागृह येथे अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिवती येथील विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, वकृत्व, लेखन, अभिनय व कलागुणांचे प्रभावी सादरीकरण करून उल्लेखनीय यश संपादन केले.
या स्पर्धेमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्राथमिक गटात दोन द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या शैक्षणिक, गुणवत्तेचा,संस्कारक्षम,अध्यापनाचा व सातत्यपूर्ण परिश्रमांचा ठसा उमटवला. प्राथमिक गटातील ओमकार विजय डांगे याने स्मरणशक्ती स्पर्धेत आत्मविश्वास पूर्ण स्मरण करून द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच स्वयंस्फूर्त लेखन या स्पर्धेत श्रीनिवास अरविंद मतलाकुटे याने सर्जनशील लेखन कौशल्याच्या जोरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
या सर्व यशामागे शाळेतील गुणवत्तापूर्ण अध्यापन सातत्यपूर्ण सराव तसेच विद्यार्थ्यांतील सुप्त गुण ओळखून त्यांना योग्य दिशा देण्याची शाळेची परंपरा कारणीभूत ठरली आहे या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक लचू पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली अश्विनी खोलाडे, त्रिरत्ना खोब्रागडे, पूजा चिलबुले, उज्वला लोखंडे, शिवाजी राठोड, अशोक जाधव, किशोर आत्राम, सूर्यभान राठोड, वसंत जाधव या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी अमर साठे, विस्तार अधिकारी संदीप चौधरी, तसेच केंद्रप्रमुख शिवाजी राठोड यांनी दिलेली प्रेरणा व मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला नवी ऊर्जा मिळाली असून भविष्यातही तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अशीच घवघवीत कामगिरी करतील असा विश्वास शिक्षक पालक व शिक्षण प्रेमींनी व्यक्त केला आहे.



