परमडोली येथे माता रमाई आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील परमडोली येथे त्याग, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती परमडोली येथील महिला मंडळाच्या वतीने अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, शाखा जिवतीचे शहर सरचिटणीस शरद वाटोरे हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक आदिलाबाद येथील समता सैनिक दलाचे रमाकांत कांबळे, संघटक शिलानंद कांबळे व संघटिका अश्विनी कळमकर मॅडम आदींनी माता रमाई या केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यातील एक ठाम, निर्भीड व धगधगती प्रेरणा होत्या असे सांगत महिलांनी शिक्षण, संघटन आणि स्वाभिमानाच्या मार्गावर ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी भारतीय बौद्ध महासभा, जिवती शहराध्यक्ष व्यंकटी कांबळे, समता दूत बालाजी मोरे, राम मोरे, व्यंकटी कोटंबे तसेच परमडोलीचे माजी सरपंच लक्ष्मण कांबळे यांनी आपल्या भाषणातून माता रमाईंच्या विचारांचा आजच्या सामाजिक वास्तवाशी संदर्भ जोडत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास तेलंगणा परमडोलीच्या सरपंच पुष्पलता राठोड व महाराष्ट्र परमडोलीच्या सरपंच लिनता बिराडे यांची उपस्थिती लाभली. यावेळी गावातील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन केले. सूत्रसंचालन किसन पंडित कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रसिद्ध खंदारे यांनी केले.



