आदिवासी अध्यासन केंद्र व शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन
आदिवासी जननायकांचा लढा आजही प्रेरणादायी : सिनेट सदस्य डॉ. सतीश कन्नाके

चांदा ब्लास्ट
भारतीय स्वातंत्र्यलढा आणि आदिवासी हक्कांच्या संघर्षात आदिवासी जननायकांनी दिलेले योगदान अतुलनीय व अनमोल आहे. भगवान बिरसा मुंडा, वीर बाबुराव शेडमाके, तंट्या भिल्ल, जत्रा भगत, रघुनाथ शाह आणि शंकर शाह यांसारख्या क्रांतीकारकांनी इंग्रजांच्या जुलमी राजवटीविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध उलगुलान पुकारले. जल, जमीन आणि जंगलाच्या रक्षणासोबतच आपली समृद्ध संस्कृती, परंपरा आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यासाठी या जननायकांनी दिलेला लढा ऐतिहासिक आहे. त्यांचे बलिदान, शौर्य आणि अन्यायाविरुद्धचा हा संघर्ष आजही आपणा सर्वांसाठी तितकाच प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक सिनेट सदस्य डॉ. सतीश कन्नाके यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ आदिवासी अध्यासन केंद्र आणि शरदराव पवार महाविद्यालय, गडचांदूर येथील राज्यशास्त्र व इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ‘आदिवासी जननायकांचे योगदान’ या विषयावर एक दिवसीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन शरदराव महाविद्यालय, गडचांदूर येथे करण्यात आले. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार सिंह होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले यांची उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक म्हणून विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राचे सदस्य डॉ. संजय गोरे आणि महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ. शरद बेलोरकर इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आयोजक डॉ. संजय गोरे यांनी विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राच्या विविध लोकोपयोगी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या संकल्पनेतून, आदिवासी जननायकांच्या क्रांतीचा आणि संघर्षाचा इतिहास आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने महाविद्यालयीन स्तरावर अशा चर्चासत्रांचे आयोजन केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या गौरवशाली इतिहासातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपल्या समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी प्रमुख मार्गदर्शक डॉ. सतीश कन्नाके यांचा सत्कार करण्यात आला. ‘विद्यापीठ आपल्या गावी’ या अभिनव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वहस्ते साकारलेले आकर्षक बांबू शिल्प सन्मानचिन्ह म्हणून देऊन त्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन इतिहास विभाग प्रमुख डॉ. शरद बेलोरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. माया मसराम यांनी मानले. या प्रसंगी विद्यापीठाच्या आदिवासी अध्यासन केंद्राचे समन्वयक डॉ. वैभव मसराम यांचेही विशेष सहकार्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. सदर चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती .



