देवाडा खुर्द येथील विहिरींचे खोलीकरण करून पाणीटंचाई दूर करा
सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत यांची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे भीषण पाणीटंचाईचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून, या संदर्भात सामाजिक कार्यकर्ता मनीष राऊत यांनी गटविकास अधिकारी नमिता बांगर यांची भेट घेऊन समस्या मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले आहे. देवाडा खुर्द गावात मागील अनेक वर्षांपासून विविध पाणीपुरवठा योजना राबवण्यात आल्या असल्या तरी, आजतागायत गावाची पाणीसमस्या सुटलेली नाही. नागरिकांना वारंवार पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर गावातील ग्रामपंचायत हद्दीतील सर्व विहिरींचे तात्काळ खोलीकरण व साफसफाई करून त्या वापरण्यायोग्य करण्यात याव्यात, तसेच त्या ठिकाणी सोलर पॅनल व पाण्याच्या टाक्या बसवून गावकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी मनीष राऊत यांनी केली आहे.
तसेच गावातील काही विशिष्ट ठिकाणी नवीन हॅन्डपंप उभारून पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



