शंकरपटाच्या माध्यमातून सर्जा- राजाची कला प्रदर्शित होते – अर्चना भोंगळे
कोरपना तालुक्यातील मौजा सांगोडा येथे बैल जोडीच्या जंगी इनामी शंकरपटाचे थाटात उद्घाटन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना : बैलजोडी शंकरपट ही आपल्या विदर्भाची आणि प्रामुख्याने ग्रामीण भागाची अस्सल संस्कृती आहे. या खेळाच्या माध्यमातून आपली जुनी परंपरा आजही टिकून आहे, शेतकरी बांधव आपल्या बैलांवर मुलांप्रमाणे प्रेम करतात.आणि हे मैदान आज त्याचेच दर्शन घडवते. बैलजोडीचे सौंदर्य आणि त्यांचा रुबाब शंकरपटाच्या मैदानात खुलून दिसतो. या माध्यमातून शेतकऱ्याच्या कष्टाचे आणि बैलांच्या अफाट शक्तीचे दर्शन सर्वांना घडते. आपल्या परंपरांचे असेच जतन होणे काळाची गरज असून शंकर पटाच्या माध्यमातून सर्जा राजाच्या कलांचे प्रदर्शन होते ,असे प्रतिपादन सौ.अर्चना देवराव भोंगळे यांनी केले.
कोरपना तालुक्यातील मौजा सांगोडा येथे आज (दि.२७) बैल जोडीच्या जंगी इनामी शंकरपटाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले .यावेळी त्या बोलत होत्या.
पुढे बोलतांना सौ. अर्चना भोंगळे म्हणाल्या की, शंकरपट ही केवळ एक शर्यत नसून ती आपल्या ग्रामीण महाराष्ट्राची खरी ओळख आहे. शंकर पटाच्या माध्यमातून सर्जा-राजाच्या अंगी असलेली चपळता आणि ताकद जगासमोर येते. आजच्या काळात अशा परंपरांमुळेच आपली कृषी संस्कृती जिवंत राहिली आहे. बैलांचे संगोपन आणि त्यांच्या प्रति असलेला आदर यातून स्पष्टपणे दिसून येतो.असेही सौ.भोंगळे यांनी सांगितले.
याप्रसंगी भाजपाचे कोरपना तालुकाध्यक्ष संजय मुसळे,सरपंच संजना बोंडे, उपसरपंच ज्योती धोटे, समाजसेवक गिरीधर काळे, ॲड. दिपक चटप, शहर महामंत्री सचिन भोयर, रवी बंडीवार, महामंत्री अरूण रागीट, माजी सरपंच सचिन बोंडे,पोलिस पाटील सुचिता पाचभाई, दिनकर धांडे,विजय लांडे, सतीश मोहितकर यांचेसह भाजपा कार्यकर्ते, शंकरपट समितीचे पदाधिकारी, शंकरपट प्रेमी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



