ब्रम्हपुरी बसस्थानक परिसरात चोरांचा सुळसुळाट
गर्दीचा फायदा घेत महिलेचे पाऊण चार लाखांचे दागिने लंपास!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- तोरगाव (बु.) येथून आपल्या गावी परत जाणाऱ्या एका महिलेच्या हॅन्डबॅगमधून अज्ञात चोरट्याने ३ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोख रक्कम पळवल्याची खळबळजनक घटना ब्रम्हपुरी बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी पुष्पा हिरालाल प्रधान (५३, रा. बरडकिन्ही) यांनी ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा प्रधान या १७ जानेवारी रोजी आपल्या बहिणीसोबत माहेरी तोरगाव (बु.) येथे गेल्या होत्या. दोन दिवस माहेरी राहिल्यानंतर, सोमवार दि. १९ जानेवारी रोजी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास त्या तोरगाव वरून ब्रम्हपुरीकडे येणाऱ्या बसमध्ये बसल्या. निघताना त्यांनी आपल्या हॅन्डबॅगमधील एका काळ्या रंगाच्या पर्समध्ये ३० ग्रॅम वजनाचा सोन्याचा कंठमणी व लॉकेट असलेले मंगळसूत्र, एक सॅमसंग कंपनीचा कीपॅड मोबाईल आणि दोन हजार रुपये रोख असा मुद्देमाल ठेवला होता.
दुपारी ३:४५ वाजताच्या सुमारास बस ब्रम्हपुरी बसस्थानकावर पोहोचली. यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. बसमधून उतरल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत त्या पुढील प्रवासासाठी बोरमाळा बसमध्ये बसल्या. बसमध्ये तिकीट काढण्यासाठी त्यांनी हॅन्डबॅग उघडली असता, बॅगची चैन अर्धवट उघडलेली दिसली. त्यांनी तातडीने तपासणी केली असता आतील काळी पर्स गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरट्याने गर्दीचा फायदा घेत अत्यंत शिताफीने बॅगची चैन उघडून सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची अंदाजे किंमत ३ लाख ७५ हजार रुपये असून, मोबाईल व रोख रकमेसह एकूण ३ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ब्रम्हपुरी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
बसस्थानकावरील वाढत्या गर्दीचा फायदा घेणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असल्याने प्रवाशांनी आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



