समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत न्याय व योजना पोहोचविण्याचा प्रयत्न – न्यायमूर्ती वृषाली जोशी
विधी सेवा महाशिबिर व योजनांचा महामेळावा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा, दि. 18 (जिमाका) : पूर्वी ग्रामीण भागामध्ये कष्टाचे जीवन होते. आता गावांमध्ये सुख, सोई, सुविधा निर्माण झाल्या आहे. या सुविधांसोबतच न्याय व योजना प्रत्येक व्यक्तींपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. विधी सेवा महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून प्रत्येक नागरिकांपर्यंत न्याय व विविध योजनेचा लाभ मिळेल, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या न्यायमूर्ती तथा वर्धेच्या पालक न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी केले.
सेलू तालुक्यातील वडगाव रोडवरील किंग्स रिसोर्ट येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व योजनांचा महामेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गायकवाड, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीपती मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जयंत उपाध्याय, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वरीष्ठ बालरोग तंज्ञ डॉ.संजय गाठे, सेलू तालुका वकील संघाचे अध्यक्ष शैलेश सातभाई आदी उपस्थित होते.
सोशल मीडियाच्या युगात माणसं जोडली जात असली तरी कौटूंबिक सुखात दुरावत चालली आहे. कुठल्या न कुठल्या कारणाने कौटूंबिक वादाचे प्रमाण वाढत आहे. हे वाद न्यायालयात न्यायासाठी येत असतात. सोबतच इतर वाद प्रकरणे सामोपचाराने मिटविण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने वर्षातून एकदा मेगा लोकअदालत व दर तीन महिन्यांनी लोकअदालतीचे आयोजन करण्यात येते. या लोक अदालतीतून मध्यस्थीने वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येते, असे पुढे बोलतांना वृषाली जोशी म्हणाल्या.
या मेळाव्यातून शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही पुढे बोलतांना वृषाली जोशी म्हणाल्या.
समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटक, दिव्यांगांना मोफत विधी सेवा पुरविणे हा विधी सेवा प्राधिकरण कायद्याचा उद्देश असून कायद्यानुसार समाजातील या घटकांना लोककल्याणकारी कायदे व योजना संदर्भात त्यांचे कायदेशिर हक्क, लाभ मिळवून देण्यासाठी मेळाव्यातून प्रयत्न करण्यात येत आहे. न्याय आणि विकास या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. आणि त्यासाठी महाशिबिर हे प्रेरणादायी माध्यम आहे. आजच्या या महाशिबिरातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा साधण्यास मदत होईल, असे न्या.हेमंत गायकवाड म्हणाले.
आपत्ती व संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी पोलिस विभागाच्यावतीने 112 टोल फ्री क्रमांक सुरु करण्यात आला. यावर मागील वर्षी 2017 तक्रारी प्राप्त झाल्या. कुटूंबातील वाद प्रकरणाच्या तक्रारीसाठी भरोसा सेल सुरु करण्यात आला असून या सेलकडे 1 हजार 825 प्रकरणे प्राप्त झाले आहे. यातील 85 टक्के प्रकरणे आपसी समझोत्याने निकाली काढण्यात आली असल्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल म्हणाले.
विधी सेवा प्राधिकरणद्वारे पुरविण्यात येणाऱ्या मोफत विधी सेवा व शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना या मेळाव्यात होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या मागील सेवा पंधरवड्यात 32 हजार लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ देण्यात आला होता. राज्य शासनाच्यावतीने बळीराजा पांदन रस्ते योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांना होणार असल्याचे श्रीपती मोरे यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्याहस्ते सामाजिक न्याय विभाग, कृषि विभाग, महिला व बाल विकास विभाग, महसूल विभाग आदी विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या योजनांच्या लाभाचे व प्रमाणपत्राचे मान्यवरांच्याहस्ते वितरण करण्यात आले. यावेळी विविध योजनेचे लावण्यात आलेल्या स्टॉलचे मान्यवराचे हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले व मान्यवरांनी स्टॉलची पाहणी केली.
यावेळी अमोल भोसले, डॉ. संजय गाठे यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमातील उपस्थितांचे आभार विवेक देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला न्यायाधीश, अधिवक्ता, वकील, मोठ्या प्रमाणावर नागरीक व लाभार्थी उपस्थित होते.



