आनंद अंध विद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त अंध विद्यार्थ्यांनी दाखविले कलागुण

चांदा ब्लास्ट
आनंद अंध विद्यालय, आनंदवनाच्या वतीने अंध विद्यालयाच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित वार्षिक स्नेहसंमेलन व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे सचिव मा. डॉ. विकासभाऊ आमटे, मा. कौस्तुभ आमटे व सौ. पल्लवीताई आमटे यांच्या मार्गदर्शनात आनंद अंध विद्यालयाच्या भव्य अशा मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रम प्रसंगी ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल, कर्णबधिरांचे प्रेरणास्थान डॉ. हेलन केलर व आनंदवन निर्मितीचे शिल्पकार श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई यांच्या प्रतिमेला मा. धनंजय साळवे, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, चंद्रपूर, मा. शुभांगी पिजदूरकर, गटशिक्षणाधिकारी, वरोरा व संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन केले. कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक शुभम काटकर व त्यांच्या अंध विद्यार्थी चमूनी स्वागत गीताने केली. त्यात त्यांनी लुई ब्रेल यांच्या जीवनावर स्वरबद्ध केलेले ‘हॅपी बर्थ डे टू यु लुई ब्रेल व स्वर्गात आकाशगंगा हे गीत गायले.
या तीन दिवसीय स्नेहसंमेलनाच्या वार्षिक उत्सवात गायन, वादन, संगीत खुर्ची, ब्रेल लिपी लेखन वाचन स्पर्धा, ‘कोण बनेगा करोडपती’ च्या धर्तीवर कोण बनेगा ज्ञानपती प्रश्न मंजुषा स्पर्धेच्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. या कृतज्ञता सोहळ्याच्या समारोपीय कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षस्थानी मा. सुधाकर कडू तर मुख्य अतिथी म्हणून मा. धनंजय साळवे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, चंद्रपूर, शुभांगी पिजदूरकर गटशिक्षणाधिकारी, गजानन हटवार कृषी अधिकारी, विद्या गिलबिले ग्रामविस्तार अधिकारी, आनंदवन, सौ. रुपाली दरेकर सरपंच ग्रामपंचायत आनंदवन, संजयकुमार पेचे सामाजिक कार्यकर्ता, विजय भसारकर मुख्याध्यापक आनंद मूकबधिर विद्यालय, आनंदवन, श्री. रविंद्र नलगिंटवार अधिक्षक संधिनिकेतन अपंगांची कर्मशाळा, आनंदवन, श्री. सेवकराम बांगडकर अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
या कार्यक्रमात रेणुका चव्हाण व वंश मडावी या दोन्ही अंध विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांसमोर आपली मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच मा. धनंजय साळवे साहेब व मा. शुभांगी पिजदूरकर गटशिक्षणाधिकारी यांचा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून अंध शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पर्णकुटीपासून तयार केलेली आनंदवन निर्मित कलाकृती व ब्रेल लिपीतील बाबांचे पोस्टकार्ड संदेश भेटकार्ड आणि सन्मानचिन्ह देऊन संस्थेचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी जाहीर सत्कार केला.
दिव्यांग क्षेत्रात गेल्या तीस वर्षापासून १० वी च्या अंध विद्यार्थ्यांना विनामूल्य शिकवणी घेत असल्याबद्दल श्री. रमेश बोपचे सर कवी तथा साहित्यिक यांचा मा. धनंजय साळवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पोस्टकार्ड व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अंध शाळेतील शिक्षिका तनुजा सव्वाशेरे यांनी अंध मुलींच्या वसतीगृहातील मुलींचा सतत गृहपाठ घेऊन स्वतःच्या शारीरिक मर्यादा असूनही अतुलनीय समर्पण भावनेने कार्य केल्याबद्दल त्यांचा शुभांगी पिजदूरकर गटशिक्षणाधिकारी यांच्या हस्ते शाल. भेटकार्ड व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सर्व शिक्षकांचाही सन्मान करण्यात आला. याप्रसंगी धनंजय साळवे यांनी दिव्यांगांना शिक्षणासोबत विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळावा व त्यांच्या कृतीयुक्त शिक्षण हे सर्व सामान्य व्यक्ती पर्यंत पोहचविले पाहिजे. प्रेम द्यावे प्रेम घ्यावे माणूसकीची नाती जोपासावी असे ते म्हणाले. तर शुभांगी पिजदूरकर गटशिक्षणाधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी केलेल्या उत्तम सादरीकरणाबद्दल कौतुक केले व मी वरो-यात असेपर्यंत सदैव तुमच्या सोबत राहील असे त्यांनी आश्वासन दिले. अंध मुलांचा उत्साह बघता मा. धनंजय साळवे साहेब यांनी चक्क विद्यार्थ्यांसोबत आदिवासी गोंडी नृत्याच्या ठेक्यावर ताल धरत थिरकले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवकराम बांगडकर यांनी केले. संचालन आचार्य परमानंद तिराणिक यांनी केले तर आभार प्रदर्शन शुभांगी महाकाळे यांनी केले. या आयोजनासाठी संगीत शिक्षक शुभम काटकर, साधना ठक कलाशिक्षिका, आचार्य परमानंद तिराणिक, वर्षा उईके विशेष शिक्षिका, तनुजा सव्वाशेरे, विलास कावनपुरे विशेष शिक्षक, शुभांगी महाकाळे, तृप्ती लोहकरे, शुभांगी डफ, जितेंद्र चुधरी व सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.


